spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पांढरकवडा नगर पालिकेत ‘बनावट’ कारभाराचा डंका; अभियंत्याने चक्क मुख्याधिकाऱ्यांचीच चोरली सही!

पांढरकवडा :- स्थानिक नगर परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला असून, एका अभियंत्याने चक्क मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून शासनाची आणि प्रशासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवीन कचरा हातगाडी खरेदीच्या करारनाम्यावर हा ‘हातसफाई’चा प्रकार घडला असून, पांढरकवडा नगर परिषदेत सध्या या ‘बनावट’ कारभाराचीच जोरदार चर्चा रंगली आहे.

पांढरकवडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज गावंडे यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर पुढील २० ते २५ दिवस ते कार्यरत होते. मात्र, नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या धामधुमीत हा पदभार तात्पुरता ‘बाबर’ यांच्याकडे सोपवण्यात आला होता. निवडणुका संपल्यानंतर २ जानेवारी २०२६ रोजी पंकज गावंडे यांनी पुन्हा मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. मात्र, दरम्यानच्या काळात स्वच्छता विभागाच्या अभियंत्याने संधी साधून चक्क मुख्याधिकाऱ्यांच्या नावे बनावट स्वाक्षरीचा प्रताप केला.

मुख्याधिकारी पदाचा पदभार गावंडे यांच्याकडे नसतानाही, त्यांच्या नावाने नवीन कचरा हातगाडी खरेदीचा करारनामा पेपरवर करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या गाड्यांसाठी हा करारनामा करण्यात आला, त्या गाड्यांची प्रत्यक्ष निर्मितीच झाली नसल्याचे समजते. केवळ कागदोपत्री दिशाभूल करून आणि बनावट स्वाक्षरीच्या बळावर शासनाच्या तिजोरीतून जास्तीचे बिल लाटण्याचा हा मोठा कट होता. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अभियंत्याचा यात थेट स्वार्थ दिसून येत असून, याआधीही संबंधित अभियंत्याने अशाच प्रकारे अनेक बनावट कामे दाखवून बोगस बिले काढल्याची चर्चा असून, या साखळीत आणखी कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

एकीकडे मुख्याधिकाऱ्यांच्या सहीचा गैरवापर होऊन फौजदारी स्वरूपाचा गुन्हा घडला असताना, दुसरीकडे प्रशासन मात्र नरमाईची भूमिका घेताना दिसत आहे. मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अभियंत्याला केवळ ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून आपले कर्तव्य पूर्ण केल्याचे भासवले आहे. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यासाठी केवळ नोटीस देणे म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा प्रकार आहे. या मवाळ भूमिकेमुळे ‘मुख्याधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने बघत आहेत की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत?’ असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

महाराष्ट्र नगर परिषद सेवा शिस्त व अपील नियमांनुसार, बनावट सही करणे हा विश्वासघाताचा आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. अशा प्रकरणात दोषी कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून, त्याची विभागीय चौकशी लावून त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची तरतूद आहे. मात्र, पांढरकवडा पालिकेत केवळ नोटिशीचा खेळ सुरू असल्याने भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत आहे.

सदर अभियंताला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून प्राथमिक चौकशी सुरू आहे. बनावट स्वाक्षरी नक्की कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून मारली, याची पूर्ण शहानिशा करून त्यानंतर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

– पंकज गावंडे, मुख्याधिकारी, नगर परिषद पांढरकवडा.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.