– शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार
मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व शेतकऱ्यासह प्रत्येकाच्या नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे आहे. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरीवर्ग पूर्ण ताकदीनिशी देवाभाऊ सरकारच्या पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल भाजपा किसान मोर्चाने राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्यात चव्हाण बोलत होते. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आ. रणधीर सावरकर, आ. प्रवीण दरेकर, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ आदी यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, केवळ भाषणे करून काही साध्य होत नाही. अनेकदा अमेरिकेच्या चर्चा होतात पण आपल्या गावातील शेतात जायला शेतकऱ्याला रस्ता हवा याचा विचार करणारा एकही नेता नव्हता. राज्यातील प्रत्येक गावात भौगोलिक परिस्थिती काय आहे, तेथील शेतीच्या नुकसानीवर काय उपाय असू शकतो हे सांगणारा आजवर एकतरी नेता होता का? मात्र पिकावर येणारे रोग, त्यामुळे झालेले नुकसानीचे छायाचित्र तंत्रज्ञान, एआय आणि ॲपच्या माध्यमातून टाकले तर त्यावर काय उपाय आहेत हे शेतकऱ्याला सांगणारे आणि त्यासाठी सरकारी यंत्रणा पाठीशी ठेवून शेतकऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणारे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृती आराखडा आवश्यक असल्याचे लक्षात घेत जगातील सर्वात मोठी जलयुक्त शिवार योजना 20 हजार गावांमध्ये लागू करण्यापासून ते पिकाच्या साठवणीसाठी गोदामे उभी करण्याचे काम या सरकारने केले. 2014 पूर्वी बारा – बारा तास लोडशेडींग असल्याने शेतकरी बेजार झाले होते. देवाभाऊंनी सौरपंपाद्वारे शेतीला पाणी उपलब्ध करत शाश्वत पर्याय देण्याचे काम केल्याबद्दल चव्हाण यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे यांनी राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मांडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठरावाला उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून आणि देवाभाऊ यांच्या नावाने जयघोष करत या मंजुरी दिली. यावेळी आ. कुटे म्हणाले की, 2014 पासून देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून किती मदत केली हे पाहण्यासाठी प्रत्येकाने आपले पासबुक पहावे. वीजपुरवठा, कोल्ड स्टोरेज, आयात – निर्यात याद्वारे या सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनात संधींची दारे खुली केली आहेत. त्यामुळे 2035 पर्यंत आम्ही देवाभाऊंना या पदावरून जाऊ देणार नाही.

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ म्हणाले, कर्जमाफी योजनेतील दोन त्रुटींमुळे सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नव्हती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या दोन्ही त्रुटी दूर करून सरसकट कर्जमाफी दिल्याने राज्यातील तमाम शेतकरी समाधानी झाले आहेत. यंदा उशिरापर्यंत पाऊस पडला नाही तरी एकाही गावात टँकरद्वारे पाणी पुरवण्याची वेळ आली नाही. हे सरकार शेतकरी, महिला आणि युवकांचा सन्मान करणारे सरकार आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, एआयच्या माध्यमातून शेतीच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्यात शेतात राबणाऱ्या अनेक शेतकरी महिलांच्या नावावर सातबारा नव्हता. त्यामुळे शेतकऱ्याचा दर्जा नसल्याने त्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही हे लक्षात घेऊन महिला शेतकरी धोरण आणणारेही हे पहिले राज्य ठरले आहे. पालघर येथील दापचेरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा बाजार आणि कृषी समृद्धी योजनेसाठी पाच हजार कोटींची तरतूद यासह अनेक योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरल्या आहेत.
आभार प्रदर्शन करताना खा. डॉ. अनिल बोंडे म्हणाले, हा सत्कार राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांच्या वतीने वचनपूर्ती करणाऱ्या सरकारचा सत्कार आहे. बोलेल तसे वागणाऱ्यांचा सत्कार आहे. गावखेड्यातली खुरपण करणाऱ्या प्रत्येक माता-भगिनीच्या मुखी फक्त देवाभाऊ हे नाव आहे.








