वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी
प्रयोगशील ३२ शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
यवतमाळ, ०२ : शेतकऱ्यांनी शेती करत असतांना कमी खर्चाची व अधिक उत्पन्न देणारी शेती करावी. बाजारामध्ये ज्या पिकाची अधिक मागणी आहे त्याची लागवड करावी, जेणेकरून आपल्या निव्वळ उत्पन्नामध्ये वाढ घडून येईल. तसेच शेतीला जोडधंदा आणि नैसर्गिक शेतीची जोड द्यावी, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पद्मश्री पुरस्कार प्राप्त शेतकरी सुभाष शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी विकास अधिकारी, लहू आडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन व्यतिरिक्त फळबाग लागवड, हळद लागवड, प्रक्रिया उद्योग, त्याचे एकत्रित विपणन या संदर्भात मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी काढून घ्यावा व कृषी विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी आपल्या मनोगतामध्ये राज्य तसेच जिल्ह्यात कृषी क्षेत्रामध्ये होत असलेल्या प्रगतीचा आलेख व लेखाजोखा मांडला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन आपले उत्पन्न वाढवावे, असे सांगितले तसेच पालकमंत्री संजय राठोड हे काही कारणास्तव हजर नसल्यामुळे त्यांनी शेतकरी बांधवांना दिलेला संदेश वाचून दाखवला.
पद्मश्री सुभाष शर्मा यांनी नैसर्गिक शेती, निसर्गाचे चक्र, पाण्याचे व्यवस्थापन, शेतीचे व्यवस्थापन, एकात्मिक शेती पद्धती, फळबाग लागवड व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून शेतीचा वाढता उत्पादन खर्च कमी करून निव्वळ उत्पन्न कसे वाढवता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन केले. संतोष डाबरे यांनी कृषी विभागाच्या मनरेगा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, पीएमएफएमई, स्मार्ट, नैसर्गिक शेती, प्रक्रिया उद्योग या योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक लहु आडे यांनी केले. आभार मोहिम अधिकारी प्रवीण जाधव यांनी मानले.
कार्यक्रमांमध्ये सन 2023-24 व 2024-25 या दोन्ही वर्षांमध्ये सोयाबीन तूर, हरभरा, गहू या पिकामध्ये उच्च उत्पादन घेतलेले व जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक मिळालेल्या 32 शेतकऱ्यांचा शाल, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सिजेंटा कंपनीच्या प्रतिनिधींनी खरीप हंगामामध्ये विषबाधा होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये प्रचार प्रसार करावा जेणेकरून जिल्ह्यामध्ये कुठली मनुष्यहानी होणार नाही सोबत कृषी विभाग यांची सुद्धा मदत घ्यावी, असे सांगितले. कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





