spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उमरेड जवळ भीषण अपघात: एका महिलेचा जागीच मृत्यू, दोन जखमी

 

नागपूर ११ : ९ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी उमरेड-भिसी मार्गावर गरडेपार गावाजवळ एका भीषण अपघातात ४० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मयत महिलेचा पती आणि मुलगीही जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळी ६:३० च्या सुमारास प्रभू फत्रुजी उईके (४७, रा. नवतडा, ता. चिमूर) हे त्यांची पत्नी मायाबाई उईके (४०) आणि मुलगी मयुरी उईके यांच्यासोबत मोटारसायकलने (क्र. MH-34 CM-1089) रामटेक येथे जात होते. ते गरडेपार गावाजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या एका १२ चाकी ट्रकने (क्र. MH-40, CT-5591) अचानक वळण घेतले. ट्रक चालक शुभम बापूराव श्रीरामे (२७, रा. गोरवट, ता. चिमूर) यांनी कोणताही इशारा किंवा इंडिकेटर न देता निष्काळजीपणे वाहन चालवल्याने मोटारसायकलची थेट ट्रकला धडक बसली.

या अपघातात मायाबाई उईके यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रभू उईके आणि त्यांची मुलगी मयुरी उईके हे दोघेही जखमी झाले आहेत.

प्रभू उईके यांनी उमरेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी ट्रक चालक शुभम श्रीरामे यांच्याविरोधात कलम २८१, १०६(१), १२५(अ) BNS आणि १८४ MV Act अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक जप्त केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक गुट्टे करत आहेत.

Popular Articles