spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बनावट औषधनिर्मितीप्रकरणी ‘इंडुकेअर’ला एफडीएचा दणका, परवाने पुन्हा रद्द

पुणे :- बनावट आणि अप्रमाणित औषधनिर्मितीप्रकरणी पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशनला अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुन्हा दणका दिला आहे. उत्पादन परवानगी न घेताच नऊ औषधांचे उत्पादन व विक्री केल्याचे उघड झाल्याने संस्थेचे उत्पादन परवाने पुन्हा रद्द करण्यात आले आहेत. शासकीय तपासणीत सर्व नऊ औषधे अप्रमाणित, मिसब्रँडेड किंवा बनावट आढळली. दोन औषधांमध्ये मूळ सक्रिय घटकच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

जेजुरी येथील अतिरिक्त एमआयडीसीमधील उत्पादन केंद्रातून घेतलेल्या नमुन्यांची मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विश्लेषकांनी तपासणी केली. संस्थेने नऊ औषधांसाठी स्वतंत्र उत्पादन परवानगी घेतली नसल्याचे लेखी खुलाशात मान्य केले. ही बाब औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० मधील कलम १८ (सी) चे उल्लंघन आहे.

दोन औषधांत सक्रिय घटकच गायब : इबुकेअर प्लसमध्ये इबुप्रोफेन, तर केअरव्हिटा-एममध्ये व्हिटॅमिन बी समूह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन सी, नियासिनामाइड, कॅल्शियम पॅन्टोथेनेट आणि मॅग्नेशियम यांपैकी एकही घटक आढळला नाही. त्यामुळे दोन्ही औषधे बनावट घोषित केली गेली. केअरझिंकमध्ये व्हिटॅमिन सी ७२.७३ टक्के, केअरपांटा डी-२ मध्ये पॅन्टोप्राझोल ४०.९०५ टक्के, डॉम्पेरिडोन ७५.३५ टक्के, आय-सार्टन एममध्ये मेटोप्रोलॉल ६२.२८ टक्के आणि केअरस्प्रिन ७५ मध्ये सक्रिय घटक ७४.८७ टक्के आढळला. काही औषधे विरघळण्याच्या चाचणीतही अपात्र ठरली.

वायसीएममधून १.७२ कोटींचा साठा जप्त : यापूर्वी संस्थेने ५५० किलोपेक्षा अधिक मेट्रोनिडाझोलच्या वापराच्या नोंदी न ठेवता केअरगिल-४००च्या १३ लाख ८६ हजार गोळ्या तयार केल्या होत्या. नमुन्यात सक्रिय घटकाचे प्रमाण ३२.४४ टक्के होते. पाच लाख २० हजार गोळ्यांचे वितरण झाले होते. वायसीएम रुग्णालयातून या उत्पादकाचा १.७२ कोटींचा अप्रमाणित औषधसाठा ४ नोव्हेंबरला जप्त करण्यात आला.

उत्पादन पद्धतीमध्ये २५ त्रुटी : जुलैतील तपासणीत उत्पादन-पॅकिंग नोंदींचा अभाव, चुकीच्या तारखा, बॅचमधील तफावत, प्रयोगशाळेतील उपकरणांचे कॅलिब्रेशन नसणे, अस्वच्छता आणि अयोग्य साठवणूक अशा २५ गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे ७ सप्टेंबरला परवाने रद्द झाले होते. ऑगस्टमधील पडताळणीतही त्रुटी कायम होत्या.

नऊ औषधांच्या प्रकरणी २९ ऑक्टोबरला नोटीस, तर २३ नोव्हेंबरला सुनावणी झाली. रुग्णांची तक्रार नसल्याचा संस्थेचा युक्तिवाद फेटाळण्यात आला. सहआयुक्त (औषधे), पुणे विभाग यांनी सोमवारी (दि. २३) फॉर्म २५ व २८ मधील परवाने पुन्हा रद्द करून उत्पादन, पॅकिंग, तपासणी व वितरण बंद करण्याचे आदेश दिले. न्यायालयीन कारवाईही प्रस्तावित आहे.

नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक औषधे उपलब्ध करून देणे ही अन्न व औषध प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. उत्पादन परवानगीशिवाय औषधनिर्मिती करून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही उत्पादकाविरुद्ध कठोर नियामक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य.

Popular Articles