– चार हॉटेल, बेकरीवर कारवाई, पंढरपुरात खळबळ
पंढरपूर :- कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरात मोठी धडक कारवाई केली आहे. या तपासणी मोहिमेत नियमभंग करणाऱ्या चार मोठ्या आस्थापनांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एकादशीच्या ऐन ४८ तासआधी एफडीएने कारवाईचा स्ट्राइक मारला आहे.
५४ ठिकाणी तपासणी; २० नमुने प्रयोगशाळेत
एफडीएच्या पथकाने काल दिवसभर पंढरपुरातील हॉटेल्स, मिठाईची दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी आणि प्रसाद विक्रेते अशा एकूण ५४ आस्थापनांची कसून पाहणी केली. तपासणीदरम्यान भगर, बटाटा चिवडा, राजगिरा लाडू आणि प्रसादाच्या पदार्थांचे सुमारे २० नमुने अन्न विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
या चार आस्थापनांचे परवाने निलंबित
तपासणीदरम्यान अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. यामध्ये पॉप्युलर रेस्टॉरंट, श्री महावीर वेज, बेंगलोर अय्यंगार बेकरी आणि स्वागत एंटरप्राइजेस या चार आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. वारीच्या काळात भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
एफडीएची २० विशेष पथके तैनात
वारीच्या निमित्ताने पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. त्यांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी शहरात एफडीएची २० विशेष पथके कार्यरत राहणार असल्याची माहिती सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली आहे. दरम्यान, कार्तिकी एकादशीचा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली वारीच्या नियोजनाची अंतिम बैठक पार पडली. यावेळी बोलताना गोरे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या गर्दीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. शेतकरी आणि वारकऱ्यांना घराबाहेर पडताना जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान समोर असल्याने यंदा भाविकांच्या संख्येत घट होऊ शकते, अशी चिंता त्यांनी बोलून दाखवली.






