– रुपेश वाळके यांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार !
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाला यश !
मोर्शी :- हवामानावर आधारित संत्रा फळ पिक विमा योजना २०२४ २०२५ चा आंबिया बहार संत्रा फळ पिक विम्याचा परतावा रब्बी हंगाम संपल्यावर ४५ दिवसांत जाहीर करणे क्रमप्राप्त असतांना हंगाम संपून ७ महिने लोटले तरीही ट्रिगर लागू नसल्याचे कारण देत विमा कंपनीने परतावा नाकारला होता. मात्र माजी आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी यशस्वी पाठपुरावा केल्यानंतर विमा कंपनीने अखेर ट्रिगर मान्य केले. आमच्या आंदोलनाची दखल घेतल्यामुळे फळ पिक विम्याचा लाभ अमरावती जिल्ह्यातील ३०१५ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १७ कोटी २६ लाख ८८ हजार ११० रुपयांचा परतावा जमा झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आधीच संकटात असून शासनाच्या व विमा कंपनीच्या जुलमी धोरणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हतबल झाला असतांना हवमानवर आधारित संत्रा फळ पिक विमा योजनेचे १७ कोटी रुपये विमा कंपनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यास विविध जाचक अटी समोर करून विमा परतवा देण्यास टाळाटाळ करीत होती. अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याया विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी लढा उभारून शासनाकडे व विमा कंपनीकडे यशस्वी पाठपुरावा करून मोर्शी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तब्बल ६ तास ठिय्या आनोदलन करून शासनाचे व विमा कंपनीचे लक्ष वेधून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पिक विमा परतावा तत्काळ वाटप करण्यात यावा अशी मागणी रेटून धरली होती. रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात १४ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये होणाऱ्या आंदोलनाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १३ डिसेंबर रोजी सदर विमा कंपनीला संत्रा फळ पिक विमा योजनेचे पैसे वाटप करण्याचे निर्देश दिल्यामुळे १३ डिसेंबर पासून हवामानवर आधारित संत्रा फळ पीक विमा योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती प्रधानमंत्री पीक विमा पोर्टलवर चढविण्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर १६ डिसेंबर पासून जिल्ह्यातील ३०१५ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १७ कोटी २६ लाख ८८ हजार ११० रुपये रक्कम थेट डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आले आहे. तसे संदेश शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर आले असल्यामुळे माजी आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासन व विमा कंपनी विरोधात लढा उभारून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळून दिल्याबद्दल अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
शेतकऱ्यांचा लढा संपलेला नाही तो सुरूच राहील !
आम्ही जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र करून आवाज उठवला, आंदोलन केलं, आपले हक्क मागितले म्हणूनच आम्हाला यश मिळालं आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. ही केवळ रक्कम नसून, शेतकऱ्यांच्या लढ्याचं फळ आहे. अजूनही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा लढा संपलेला नाही तो सुरूच राहील आणि तो यशस्वी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही – रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका




