बेला भागातील प्रवाशांची गैरसोय झाली दूर – उत्तम पराते
बेला दि. २७ : प्रवाशांची वारंवार होणारी आग्रही मागणी, पेपरबाजी व असंख्य प्रवाशांची दैनंदिन होणारी वर्दळ, वाहतूक लक्षात घेता अखेर नागपूर येथील विभाग नियंत्रकांनी चंद्रपूर मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या सर्व जलद बसला सोनेगाव (लोधी) येथे थांबण्याचा लेखी आदेश दिला. त्यामुळे बेला व परिसरातून ये जा करणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांना दिलासा मिळाला असून त्यांची काही प्रमाणात गैरसोय दूर झाली आहे.
जिल्हा व तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले बेला गाव मोठे व महत्त्वपूर्ण आहे. येथून नागपूर, हिंगणघाट वर्धा,उमरेड येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ, वाहतूक असते. परंतु बसेसच्या कमतरतेमुळे असंख्य प्रवाशांना ठिकठिकाणी ताटकळत उभे रहावे लागत होते. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी व वृद्ध स्त्री, पुरुष प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या संदर्भात त्रस्त प्रवाशांनी नागपूरचे विभागीय वाहतूक अधिकारी श्रीकांत गभणे व विभाग नियंत्रक चौरे यांना लेखी मागणी व विनंती अर्ज करून बस फेऱ्या वाढवण्याची व सोनेगाव लोधी येथे जलद थांबा देण्याची आग्रही मागणी केली होती. याशिवाय, दैनंदिन प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी अनेकदा संबंधितांना फोन करून होणाऱ्या त्रासाबाबत सांगितले होते. तरीपण दखल घेतल्या गेली नाही.शेवटी स्थानिक पत्रकारांनी ही समस्या वर्तमानपत्रातून छापली. त्यामुळे अखेर 16 जूनला नागपूरचे विभाग नियंत्रकांनी चंद्रपूर,भंडारा,वर्धा,यवतमाळचे विभाग नियंत्रकांना चंद्रपूर मार्गावरून जाणाऱ्या सर्व बसेसला सोनेगाव लोधी येथे थांबण्याचा व येताना जाताना तेथून प्रवासी घेण्याचा आदेश जारी केला. नागपूर येथील घाट रोड, गणेशपेठ, वर्धमाननगर इमामवाडा,सावनेर,उमरेड,काटोल व रामटेकच्या आगार प्रमुखांना सुद्धा नागपूर चंद्रपूर मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व रा.प बसेस सोनेगाव येथे थांबवून प्रवासी चढ – उतार करण्याबाबत आपल्या आगारातील चालक वाहकांना सूचना देण्यात याव्या व याबाबत कुठल्याही प्रकारची प्रवासी तक्रार उद्भवणार नाही. याची दखल घेण्यात यावी.असे नागपूर विभाग नियंत्रकांनी लेखी कळविले आहे.
प्रवाशांनी मानले आभार
नागपूर चंद्रपूर मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या सर्व जलद बसेसला सोनेगाव (लोधी) येथे थांबण्याचा आदेश दिल्याबद्दल दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी रामदास चिंचुलकर, चंद्रशेखर धाबर्डे, दिनेश बोरकर व अनेकांनी विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी व स्थानिक पत्रकारांचे आभार मानले. जलद बसचा थांबा दिल्यामुळे बेला व परिसरातील नागरिकांची गैरसोय काही प्रमाणात दूर होईल. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सायंकाळची बसफेरी वाढवा
नागपूर गणेशपेठ आगारातून दुपारी 4 वाजता नंतर साडेपाच वाजता बेला गावासाठी एकच बस फेरी सुटते. त्यावेळी मार्गावर प्रवाशांची तुफान गर्दी असते. बस मधील शंभरावर प्रवासी ठिकठिकाणी मार्गावर दुसऱ्या बसची
ताटकळत वाट पाहत असतात. कोरोनापूर्वी सायंकाळी 4.45 वा. उमरेड आगाराची नागपूर बेला मार्गे उमरेड ही बस फेरी सुरू होती ती कोरोना संपल्यानंतरही अजून पर्यंत सुरू झाली नाही. ती सुरू करण्यात यावी. अशी प्रवाशांची आग्रही मागणी आहे.




