गर्भवती महिलेच्या हत्या प्रकरणात चौघांना अटक

0
1

अहिल्यानगर :- धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात एका ३१ वर्षीय गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी तिला बेदम मारहाण करत जिवंत जाळलं. या प्रकरणाचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत यशस्वी छडा लावला आहे. पोलिसांनी धडक कारवाई करत दोन महिलांसह एकूण चार आरोपींना बेड्या ठोकल्या. या आरोपींना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सप्तसूर कला केंद्राच्या पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, या हत्येप्रकरणाशी आणि आरोपींशी कला केंद्राचा कोणताही संबंध नसल्याचा महत्त्वपूर्ण खुलासा केंद्र चालकांनी केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड येथील रहिवासी असलेल्या पिंकी हनुमंत काटकर (वय ३१ वर्षे) या गर्भवती महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. गर्भवती महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या ७२ तासांत चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

कला केंद्र चालकांचे स्पष्टीकरण

आरोपींना जामखेड येथील ‘सप्तसूर कला केंद्राच्या’ पार्किंग परिसरातून ताब्यात घेण्यात आल्यामुळे या हत्या प्रकरणात कला केंद्राचं नाव जोडलं जात होतं. यावर स्पष्टीकरण देताना कला केंद्राचे चालक रवी अंधारे यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले आरोपी हे कला केंद्रात कामाला नव्हते. ते केवळ या ठिकाणी कामाच्या शोधात आले होते. चालक रवी अंधारे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केलं की, आरोपींचा आणि पीडित महिलेचा जो काही वाद किंवा घटनेशी संबंधित प्रकार घडला, तो सर्व कला केंद्राच्या बाहेर घडलेला आहे. आरोपी केवळ वाहनतळ परिसरात थांबलेले असताना पोलिसांनी त्यांना तेथून ताब्यात घेतलं. त्यामुळे या गुन्ह्याशी किंवा आरोपींच्या कृत्याशी कला केंद्राचा थेट काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.