जागतिक हृदय दिन : तरुणाई हृदयविकाराच्या उंबरठ्यावर! ‘सायलेंट अटॅक’चा गंभीर धोका

0
3

बदलती जीवनशैली, वाढता ताण, शारीरिक निष्क्रियता, तंबाखूचे सेवन, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा यामुळे भारतात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका वाढत आहे. विशेष म्हणजे हृदयविकार आता केवळ ज्येष्ठांचा आजार राहिला नसून, कमी वयातील व्यक्तींमध्येही त्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे विविध आरोग्यविषयक अभ्यासांतून समोर आले आहे. जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयाच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी अधोरेखित केली.

भारतातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे २५ ते २८ टक्के मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांशी संबंधित होत आहेत. ‘भारतीय प्रौढांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित विकार सुमारे ११ टक्के आहे. उच्च रक्तदाबाचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांच्या आसपास असून, बदलता आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे जोखीम घटक वाढत आहे,’ अशी माहिती ‘कार्डिओलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया’ने दिली आहे. संघटनेने या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतीयांच्या बाबतीत कमी वयात हृदयविकाराचा धोका हा चिंतेचा विषय आहे. भारतीय पुरुषांमध्ये येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांपैकी सुमारे निम्मे झटके वयाच्या ५० पूर्वी येत आहेत. शरीराचे वजन सामान्य असले, तरी पोटाभोवती आणि अंतर्गत अवयवांभोवती चरबी साठण्याचा धोका, इन्सुलिन प्रतिरोध यांचाही हृदयविकाराच्या जोखमीशी संबंध जोडला जातो.’

हृदयरोगतज्ञ काय सांगतात ?

हदय विकार टाळण्यासाठी रक्तदाब, रक्तातील साखर आणि चरबीची नियमित तपासणी, तंबाखू टाळणे, संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाल याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तरुण हृदयविकाराचा धोका वाढत आहे. दहा प्रकरणांमधील चार प्रकरणे तरुण वर्गाची आहेत. यापासून बचाव करायचा असेल, तर जीवनशैली बदलावी लागणार आहे. लेझर प्रणालीमुळे हदयविकारावर होणाऱ्या शस्त्रक्रिया अधिक सुलभ झाल्या आहेत.

ससून सर्वपचार रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर राजेश कार्यकर्ते म्हणाले की, ससून रुग्णालयात हृदय शस्त्रक्रियांचा आकडा वाढता असून, ससून रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकरात लवकर व्हावे, ही आमची मागणी आहे. यामुळे हृदयविकारांच्या रुग्णांना अधिकाधिक सेवा देता येईल.

उशिरा जेवणं आणि रक्तदाबाचा संबंध

रक्तदाबही शरीराच्या जैविक घड्याळाशी संबंधित असतो. साधारणपणे झोपेच्या वेळी रक्तदाब कमी होतो. मात्र, झोपेची वेळ सतत बदलत असेल, रात्री उशिरापर्यंत जागरण होत असेल आणि त्याच वेळी उशिरा जेवण्याची सवय असेल, तर शरीराच्या या नैसर्गिक लयीत व्यत्यय येऊ शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, अनियमित झोप आणि शरीराच्या जैविक घड्याळातील विस्कळीतपणाचा संबंध उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेतील बिघाड, लठ्ठपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजाराच्या जोखमीशी आढळतो.