किशोर साहू, मौदा ,ता.१८:- नवोदय विद्यालय प्रवेश मुख्य परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थी पात्र व्हावे व त्या अनुषंगाने त्यांची भरीव तयारी व्हावी याकरिता इयत्ता पाचवीतील प्रवेश परीक्षेला बसलेली धानोली व खात केंद्रातील एकूण 97 विद्यार्थ्यांची सराव प्रवेश परीक्षा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खात येथे घेण्यात आली.
नवोदय विद्यालय ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. येथे मिळणारे मोफत शिक्षण व शालेय सुविधांनी सुसज्ज असलेला शालेय परिसर याचे विद्यार्थ्यांना आकर्षण निर्माण व्हावी. यासाठी त्यांचे नवेगाव खैरी येथील नवोदय विद्यालयाला भेट सुद्धा याआधी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे मागील वर्षी जि प उच्च प्राथमिक शाळा घोटमुंढरी येथील मोनाली श्रावणकर ही विद्यार्थिनी नवोदय विद्यालयासाठी प्रवेश पात्र ठरली. म्हणून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा व त्यांचा परीक्षेच्या अनुषंगाने आत्मविश्वास वाढावा यासाठी धानोली व खात केंद्राचे केंद्रप्रमुख अरविंद भिवगडे यांनी सदर सराव परीक्षेचे मोफत आयोजन केले.सराव परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक कृष्णा ठाकरे, सहशिक्षक अमृत हांडेवार, मुख्याध्यापक धानोली कृष्णदास समरीत , शिक्षकवृंद प्रल्हाद चुटे, सुदेंदू सुखदेवे,उमेश बागडकर,इंद्रायणी थुलकर, शिशुपाल प्रत्येके,प्रमोद मुरुतकर यांचे अमूल्य सहकार्य लाभले.




