नागपूर :- फ्रिमेसन्स ऑफ नागपूरतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही 24 जून रोजी ‘जागतिक बंधुभाव दिन’ उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त नागपुरात विविध सामाजिक, आरोग्य विषयक आणि जनजागृती वरील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. जागतिक बंधुभाव दिन समितीचे अध्यक्ष तथा रीजनल ग्रँड लॉज ऑफ वेस्टर्न इंडियाचे डेप्युटी रीजनल ग्रँड मास्टर तरुण श्रीवास्तव यांनी सांगितले की, समाजात बंधुभाव, एकता, सहिष्णुता आणि सामाजिक समरसतेची भावना दृढ करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. विविधतेत एकता आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रसार हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यावर्षीच्या सोहळ्यानिमित्त नागपुरात अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये 21 जून रोजी थॅलेसेमिया जनजागृती वॉकाथॉन, 22 जून रोजी के. राईट वर्शिपफुल ब्रदर जी.एल. शाह स्मृती टेबल टेनिस स्पर्धा, 23 जून रोजी ‘जन आक्रोश’ संस्थेच्या सहकार्याने रस्ता जनजागृती कार्यक्रम, तसेच 24 जून रोजी शिवाजी नगर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
मुख्य जागतिक बंधुभाव दिन सोहळा 24 जून रोजी सायंकाळी 5 वाजता. ब्लाइंड रिलीफ असोसिएशन हॉल, लक्ष्मी नगर येथे होणार आहे. याशिवाय नागपूर येथील फ्रिमेसन्स हॉलमधील ऐतिहासिक मॅसोनिक टेंपल सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला ठेवण्यात येणार असून नागरिकांना फ्रिमेसनरीच्या कार्याची माहिती देण्यात येणार आहे. पत्रपरिषदेत फ्रिमेसनरीच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि समाजोपयोगी उपक्रमांविषयीही माहिती देण्यात आली. फ्रिमेसनरी ही जगभरातील बंधुभाव, मदत आणि सत्य या तत्त्वांवर आधारित संस्था असून शिक्षण, आरोग्य, आपत्ती निवारण, रक्तदान, शिष्यवृत्ती आणि विविध धर्मादाय कार्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असल्याचे सांगण्यात आले.
नागपुरातील फ्रिमेसन्स दरवर्षी लाखो रुपयांचे गुप्त धर्मादाय कार्य करीत असून शहरात सध्या 20 लॉजेस कार्यरत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागपूर आणि परिसरातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयोजकांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी तरुण मेहरा, रविंद्र तिवारी, हेमंत जहागीरदार, संजय चतुर्वेदी, आदित्य वरणगांवकर, कपील बाहेरी, अमलेश पुरोहित, आयोजन सचिव आदित्य वर्मा यांच्यासह अन्य पदाधिकार्यांन पैकी शुभांगी गर्ग आणि अंशिका कानेटकर यांची उपस्थिती होती. यावेळी संचालन शिरीष बोरकर यांनी केले. पत्रपरिषदेच्या माध्यामातून सर्व नागरिकांना जागतिक बंधुभाव दिनाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.







