spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुंबईच्या ग्लॅमरकडून अंबरनाथच्या काळया मातीकडे दर्शना दामले यांनी कृषी क्षेत्रात उमटविला महिला सक्षमीकरणाचा ठसा

नवी मुंबई :- मुंबईच्या झगमगत्या वातावरणात लहानाचे मोठे होऊनही निसर्ग ओढ आणि जिद्दीच्या जोरावर शेतीत नंदनवन फुलवता येते, हे अंबरनाथ तालुक्यातील जांभूळघर येथील दर्शना आनंद दामले यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ‘इच्छा तिथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे लग्नानंतर बदलापूर येथे स्थायिक झालेल्या दर्शना यांनी माहेरी शेतीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ झाडांविषयीच्या प्रेमापोटी शेतीकडे पाऊल वळवले. त्यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक प्रगतीपुरता मर्यादित नसून, त्यांनी महिला सक्षमीकरण आणि एकात्मिक शेती पद्धतीचा यशस्वी मेळ घालत समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

दर्शना यांच्या या प्रवासाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती २००९ मध्ये झालेल्या युरोप दौऱ्यामुळे. कृषी विभागामार्फत त्यांची निवड जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि स्पेन अशा देशांच्या अभ्यास दौऱ्यासाठी झाली होती. या दौऱ्यात त्यांनी वाइनरी टेक्नॉलॉजी, सौर ऊर्जा आणि बायोगॅस यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला. परदेशातील हे प्रगत तंत्रज्ञान त्यांनी आपल्या अंबरनाथमधील दोन हेक्टर शेतीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आज त्यांच्या शेतात विहिरीच्या पंपापासून ते सर्व शेतीकामांपर्यंत विजेचा वापर पूर्णपणे थांबवून सौर ऊर्जेचा वापर केला जातो, जे शाश्वत शेतीचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता त्यांनी एकात्मिक मिश्र शेती पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यांच्या शेतात आज आंबा, भाजीपाला, नारळ, काजू, पेरू, चिकू आणि पपई अशा विविध फळबागा डोलत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पशुपालनातही आधुनिकता जपली असून १० गाई आणि ५ म्हशींसाठी ‘मुक्त संचार गोठा’ पद्धत विकसित केली आहे. यामध्ये आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध ‘पुगनूर’ जातीच्या दुर्मिळ बुटक्या गाईचाही समावेश आहे. रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा देत त्या स्वतः गांडूळ खत निर्मिती करतात आणि फवारणीसाठी गोमूत्राचा वापर करून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देतात.

दर्शनाताईंच्या कार्याची व्याप्ती केवळ कृषी क्षेत्रापुरती मर्यादित नाही. ‘गायत्री कुटुंब समुपदेशन केंद्रा’च्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरण आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातही मोठे कार्य केले असून, त्यासाठी त्यांना राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यासोबतच त्यांनी आता रत्नागिरी जिल्ह्यातही कृषी विभागाच्या सहकार्याने नारळ आणि आंबा बागांची यशस्वी लागवड केली आहे. शासनाच्या ‘यशस्विनी’ अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत त्या ‘PMFME’ योजनेद्वारे इतर महिलांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि जिद्दीच्या जोरावर महिला शेती क्षेत्रात क्रांती घडवू शकतात.

Popular Articles