गडचिरोली पोलिसांकडून माओवाद्यांचे स्फोटक साहित्य जप्त

0
68

गडचिरोली :- गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील लेकुरबोडी जंगलात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य जप्त केले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा घातपात करण्याचा मोठा कट उधळला गेला आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, लेकुरबोडी जंगल परिसरात माओवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने स्फोटके लपवून ठेवली आहेत. या माहितीच्या आधारे १५ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष अभियान पथके आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) या भागात शोधमोहिमेसाठी रवाना झाले.

१६ सप्टेंबर २०२५ रोजी शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना जंगलात एक संशयास्पद जागा आढळून आली. बीडीडीएस पथकाने तपासणी केली असता, त्या ठिकाणी माओवाद्यांनी लपवून ठेवलेले साहित्य सापडले. यामध्ये १.२५ किलो पांढरी स्फोटक पावडर, २.५० किलो धारदार लोखंडी सिलींडर, ४ क्लेमोर बॉम्ब आणि ८ इलेक्ट्रिक वायरचे बंडल यांचा समावेश होता. पोलिसांनी हे सर्व साहित्य सुरक्षितपणे जप्त केले.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या यशस्वी कारवाईबद्दल सर्व अधिकारी आणि जवानांचे कौतुक केले आहे. तसेच, त्यांनी माओवाद्यांना हिंसा सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून ते सन्मानाने जीवन जगू शकतील. या भागातील माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.