11 वर्षीय मुलाचे अपहरण आणि खून; तीन आरोपींना अटक

0
63

सोमवार :- १५ सप्टेंबर रोजी अपहरण झालेल्या एका ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. जित युगराज सोनेकर असे या मृत मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी तिन्ही आरोपींनी भानेगाव बसस्टॉप येथून जितचे अपहरण केले. त्याला एम. एच. ४०, ए-७९९७ क्रमांकाच्या कारमधून सिल्लेवाडा परिसरात नेले आणि तिथे गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी जितचा मृतदेह चनकापूर कॉलनीतील एका क्वार्टरमध्ये लपवून ठेवला होता.

पोलिसांची शोधमोहीम सुरू असल्याची माहिती आरोपींना मिळाल्यावर, त्यांनी १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास मृतदेह चनकापूर कॉलनीच्या शिवारात झुडुपात फेकून दिला.

जितची आई नीलिमा युगराज सोनेकर (वय ३५) यांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. जित हा शंकरराव चव्हाण इंग्लिश मीडियम शाळेत सहाव्या वर्गात शिकत होता. १५ सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यावर तो नेहमीप्रमाणे घरी परत न आल्याने त्याच्या आईने त्याची चौकशी केली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, ओळखीचे नातेवाईक, मित्र आणि शाळेतील शिक्षकांच्या मदतीने तपास सुरू केला. १७ सप्टेंबर रोजी चनकापूर कॉलनीच्या शिवारात एका मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता, तो मृतदेह जितचाच असल्याचे निष्पन्न झाले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी राहुल गौरीलाल पाल (वय २५), अरुण बैचु भारती (वय २५) आणि यश गिरीश वर्मा (वय २१) यांना अटक केली. चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

फाईल फोटो