नितीन गडकरी यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य: ‘दादागिरी’ करणारे आर्थिकदृष्ट्या बलाढ्य आणि तंत्रज्ञानाने प्रगत आहेत
नागपूर ११ : भारताला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी निर्यात वाढवणे आणि तंत्रज्ञानात प्रगती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर येथील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT) येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, “जे देश ‘दादागिरी’ करतात, ते आर्थिकदृष्ट्या बलाढ्य आणि तंत्रज्ञानाने प्रगत असल्यामुळेच करतात. जर आपली निर्यात आणि आर्थिक विकास दर वाढला, तर आपल्याला कुणाकडेही जाण्याची गरज पडणार नाही.” मात्र, भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तरी आपली ‘विश्वकल्याणाची’ संस्कृती कधीही सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “आपण तंत्रज्ञानात पुढे गेलो तरीही कोणावर दादागिरी करणार नाही, कारण ती आपली संस्कृती नाही,” असे ते म्हणाले.
वैज्ञानिक प्रगतीवर भर
गडकरी यांनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, जगातील सर्व समस्यांवर विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञान हाच एकमेव उपाय आहे. संशोधन केंद्रे, आयआयटी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी देशाच्या गरजा लक्षात घेऊन संशोधन करावे. प्रत्येक जिल्हा आणि राज्याच्या क्षमतांचा विचार करून काम केल्यास देशाचा आर्थिक विकास दर तिपटीने वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेच्या निर्णयावर सूचक भाष्य
गडकरी यांचे हे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादल्यानंतर आले आहे. ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाचा हवाला देत, भारताने रशियाकडून केलेल्या तेल आयातीमुळे अमेरिकेला ‘असाधारण धोका’ निर्माण होत असल्याचा दावा केला होता. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचा हा निर्णय ‘अन्यायकारक, अयोग्य आणि अवास्तव’ असल्याचे म्हटले असून, राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पाऊले उचलण्याचे जाहीर केले आहे. गडकरी यांचे हे वक्तव्य याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे.




