Home Latest News गणेशोत्सव हा राज्य महोत्सव राज्य महोत्सवांतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा...

गणेशोत्सव हा राज्य महोत्सव राज्य महोत्सवांतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

0
53

नवीमुंबई,  दि.२२ : राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. या महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (मुंबई) यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे ऑनलाइन स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 25ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या मंडळांना तालुकास्तरावर प्रथम, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे गौरवचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन, सार्वजनिक गणपतींचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे तसेच मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा याचबरोबर राज्यातील विविध नामवंत सार्वजनिक गणेश मंडळांचे थेट लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in  या पोर्टलव्दारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलव्दारे विनामूल्य प्रसिध्द करता येतील. याकरिता अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे ganeshotsav.pldmka.co.in  या पोर्टलव्दारे प्रसिध्द करावी जेणेकरुन सर्वांना श्री गणरायाचे दर्शन घेता येईल.

मंत्री ॲड. अशिष शेलार यांनी यावेळी सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, तसेच विविध शासकीय विभागांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करण्यासाठीच ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, महिला सबलीकरण, आरोग्य शिक्षण, वाचनालय उपक्रम, खेळ व सांस्कृतिक स्पर्धा, विज्ञान-तंत्रज्ञान प्रसार, पर्यावरणपूरक मूर्ती, प्रदूषणमुक्त वातावरण निर्मिती, सजावट व प्रदूषण रहित वातावरण अशा विविध घटकांच्या आधारे परीक्षक समितीमार्फत परीक्षण करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे समाजातील सर्व स्तरांपर्यंत गणेशोत्सवाचा सांस्कृतिक संदेश पोहोचून एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करत या गणेशोत्सव स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.