spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्यात बागा उद्ध्वस्त, रस्ते खड्डेमय; मनसेने धरला आक्रमक पवित्रा

– लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाची जोरदार मागणी

हंसराज भंडारा :- शहरातील लहान मुलांच्या खेळाच्या बागांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पसरलेला कचरा तसेच मुख्य रस्त्यांची झालेली चाळण या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत नगराध्यक्षांना मागण्यांचे निवेदन सादर केले. शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी सुरू असल्याने लहान मुलांचा कल खेळाच्या बागांकडे वाढला आहे. मात्र, शहरातील अनेक सार्वजनिक बागांमध्ये खेळण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात तुटलेले असून कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात. झाडे-झुडपे अनियंत्रित वाढल्यामुळे बागांची अवस्था बिकट झाली आहे. या परिस्थितीमुळे मुलांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून तातडीने स्वच्छता मोहीम राबवून बागांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच शहरातील राजीव गांधी चौक ते लायब्ररी चौक दरम्यान गटार लाईन टाकण्याचे काम करण्यात आले असले तरी त्यानंतर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्डेमय झालेल्या या मार्गावरून वाहन चालवताना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करून तो वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन सादर करताना मनसे जिल्हाध्यक्ष नितीन वानखेडे, उपाध्यक्ष शैलेश गजभिये, शहराध्यक्ष नितीन खेडीकर, शहर उपाध्यक्ष शरद साकुरे, पुष्पल मोरे, लकी पाल, अभिषेक मडावी, हर्षल भजनकर, सौरभ मशीदकर, अमान राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.