spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रक्ताअभावी रुग्णांचे हाल; भंडाऱ्यात शिबिरांची गरज तीव्र

– उपचार प्रक्रियेवर परिणाम; नागरिकांनी स्वेच्छेने पुढे येण्याचे आवाहन

हंसराज, भंडारा :- जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात सध्या रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रुग्ण, प्रसूतीतील माता तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी आरोग्य व्यवस्थेसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे.

रुग्णालयातील रक्तपेढीत दररोज अनेक रुग्णांचे नातेवाईक रक्तासाठी धाव घेत असले तरी उपलब्ध साठा अपुरा पडत आहे. आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र असून यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा रक्तपेढीतील डॉ. विजय कुनघाटकर यांनी सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे तसेच शैक्षणिक संस्थांना तातडीने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून जीव वाचविण्याची सर्वोच्च सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रक्तपेढीच्या आकडेवारीनुसार दर महिन्याला सुमारे 500 ते 700 युनिट रक्ताची आवश्यकता असते. मात्र सध्या केवळ 300 ते 350 युनिट रक्त उपलब्ध होत असल्याने तुटवडा तीव्र झाला आहे. याचा थेट परिणाम आपत्कालीन शस्त्रक्रिया, अपघातातील रुग्ण आणि गर्भवती महिलांच्या उपचारांवर होत आहे.

रक्तदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे सांगत डॉ. कुनघाटकर यांनी रक्तदान ही सुरक्षित, सोपी आणि आरोग्यास हितकारक प्रक्रिया असल्याचे नमूद केले. नियमित रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्तपेशी निर्माण होतात आणि दात्याचे आरोग्यही चांगले राहते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिरांचे नियोजन सुरू केले असून जिल्हा रक्तपेढीकडून त्यांना सहकार्य करण्यात येत आहे. प्रशासनानेही या मोहिमेला गती देण्याचे संकेत दिले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे असून शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटना आणि समाजसेवी गटांनी एकत्र येऊन नियमित रक्तदान उपक्रम राबविल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

रक्तदान हे महादान असून आज दिलेले रक्त उद्या कोणाच्या जीवनाचे कारण ठरू शकते, असा संदेश यानिमित्ताने देण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.