– कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल कावरे यांची वाहनचालकावर कारवाई
पांढरकवडा :- शहरातील वाहतूक शिस्त आणि मोटार वाहन नियमांचे पालन व्हावे, यासाठी पांढरकवडा पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलीस स्टेशन परिसरात चक्क ट्रिपल सीट वाहन घेऊन आलेल्या वाहनचालकावर पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल कावरे यांनी कारवाई केल्याने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच धडा मिळाला आहे.
दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे हा वाहतूक नियमांचा स्पष्ट भंग असून, अशा प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढतो. अनेकदा तरुणांकडून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. हेल्मेटचा वापर न करणे, ट्रिपल सीट प्रवास करणे तसेच वेगाने वाहन चालविणे यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते.
दरम्यान, पोलीस ठाण्यातच ट्रिपल सीट मोटारसायकल घेऊन आलेल्या चालकावर पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल कावरे यांनी तातडीने कारवाई केली. कायदा सर्वांसाठी समान आहे, हा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत असून, वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
कर्तव्य बजावताना कुठलीही तडजोड नको
वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना केवळ रस्त्यावरच नव्हे, तर पोलीस ठाण्याच्या परिसरातही नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. कर्तव्य बजावताना नियमांशी तडजोड न करणारे अधिकारी हीच आजच्या काळाची गरज आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पोलिसांची कारवाई ही केवळ दंडात्मक न राहता वाहनचालकांमध्ये वाहतूक शिस्तीची जाणीव निर्माण करणारी ठरावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





