– मान्यवरांच्या हस्ते ‘धरा भूषण पुरस्कार’ प्रदान
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि तेजस्विनी महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. २) कविवर्य सुरेश भट सभागृह येथे ‘धरा भूषण पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नागपूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या स्वच्छता दूतांच्या योगदानाची दखल घेत त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. मनपाच्या ९ झोन अंतर्गत कार्यरत शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते नागपूर शहरातील विविध झोनमधील स्वच्छता व्यवस्थेत विशेष योगदान देणारे स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांना ‘धरा भूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला धरमेठ झोन सभापती धनश्री देशपांडे, नगरसेवक सुनील हिरणवार, जयप्रकाश गुप्ता, मनपा स्वच्छता निरीक्षक दीनदयाळ टेंभेकर, झोनल स्वच्छता अधिकारी लोकेश बासनवार, दिनेश कलोडे, आनंद कोडस्कर, राजेश गायधने, सुरेश खरे, शशिकांत समुद्रे, जयवंत जाधव, स्वच्छ भारत मिशन नागपूरच्या ब्रँड अँबेसिडर व तेजस्विनी महिला मंचच्या प्रमुख किरण मुंदडा तसेच अन्य मान्यवर व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उपक्रमातून त्यांच्या योगदानाला सन्मान देण्यासोबतच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्पांचा वर्षाव करून करण्यात आले. सर्व झोननिहाय स्वच्छता कर्मचाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्या उपस्थितीची नोंद करण्यात आली. कार्यक्रमाला आलेल्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी टंग ट्विस्टर, माईंड गेम्स आणि इतर गमतीदार खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठीचे सेवाभावी कार्य निरंतर सुरू ठेवावे
कार्यक्रमाचे विशेष अतिथी नगरसेवक सुनिल हिरणवार यांनी आपले विचार व्यक्त करतांना तेजस्विनी महिला मंचाच्या माध्यमातून नागरिकत्वाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत २०२१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते मंचाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी असेच सेवाभावी कार्य निरंतर सुरू ठेवावे, सर्वांनी निरोगी राहावे, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याची परंपरा कायम जपावी, असे मत व्यक्त केले. नागपूर शहराच्या हितासाठी आणि विकासासाठी महिला मंचाचे यापुढेही असेच सकारात्मक योगदान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम
स्वच्छ भारत मिशन नागपूरच्या ब्रँड अँबेसिडर व तेजस्विनी महिला मंचाच्या अध्यक्षा श्रीमती किरण मुंधडा यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कार्याची अनेकदा योग्य दखल नागरिकांकडून घेतली जात नसल्याचे सांगत त्यांनी आपण जेव्हा स्वच्छ आणि सुंदर रस्त्यांवरून प्रवास करतो, तेव्हा त्यामागे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम असतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपल्या परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांची माहिती आणि कार्याची जाणीव असणे आवश्यक आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे केवळ कर्मचारी म्हणून न पाहता त्यांना शहराचे ‘स्वच्छता सेनानी’ म्हणून सन्मान द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नागपूर शहरातील विविध झोनमधील उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘धरा भूषण पुरस्कार’ प्रदान करून सत्कार करण्यात आला. या पुरस्काराची विभागणी प्रत्येक झोनमधील उत्कृष्ठ स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक, आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी श्रम गौरव पुरस्कार, स्वच्छता गौरव आणि स्वच्छता शक्ती सन्मान (विशेषतः महिलांसाठी) अशा पद्धतीने करण्यात आली होती. या पुरस्कारासाठी मनपाच्या विविध झोनच्या वतीने उत्कृष्ट सेवा देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची यादी तेजस्विनी महिला मंचला दिली जाते, त्या यादीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रत्यक्ष पाहणी करून पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.








