spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव; राखी बांधून व्यक्त केली कृतज्ञता

चंद्रपूर :- शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी अहोरात्र समर्थपणे पार पाडणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास महापौर संगीता राजेंद्र खांडेकर तसेच महिला व बाल कल्याण सभापती संगीता मंगल भोयर व उपसभापती सईदाबी ताजु शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी हे कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही सातत्याने आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा स्नेहपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून परस्परांमधील स्नेह, विश्वास आणि कृतज्ञतेचा बंध दृढ करणारा सण आहे. याच भावनेतून महानगरपालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ‘स्वच्छता योद्ध्यां’सोबत रक्षाबंधन साजरे करत त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला.

महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांमधील आपुलकीचा बंध अधिक दृढ करण्यास या उपक्रमाची मदत झाली.

Popular Articles