– राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पदकांची लयलूट!
पांढरकवडा :- जपान शोतोकन कराटे-डो कन्निंजुकू ऑर्गनायझेशन इंडियाच्या वतीने आयोजित ‘अखिल भारतीय कन्निंजुकू शोटो कप कराटे चॅम्पियनशिप आणि उन्हाळी प्रशिक्षण शिबिर २०२६’ मध्ये पांढरकवडा येथील खेळाडूंनी पदकांची लयलूट करत ऐतिहासिक कामगिरी केली. विरार जवळील अर्नाळा येथील ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट येथे पार पडलेल्या या ५ दिवसीय शिबिरात देशभरातील विविध राज्यांतील २५० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
या राष्ट्रीय स्तरावरील शिबिरात हंशी परमजीत एस. सिंग यांनी खेळाडूंना जागतिक कराटे महासंघाच्या (डब्ल्यू के एफ) नवीन नियमावलीचे प्रशिक्षण दिले. यावेळी शिहान सुमा सिंह (सेक्रेटरी, जे.एस.के.के.ओ इंडिया) यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. यवतमाळ जिल्हा कराटे असोसिएशन द्वारा संचालित पांढरकवडा केंद्रातील ११ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत काता व कुमिते प्रकारात आपले कसब दाखवले.
पांढरकवड्यातील अर्हत राहुल मेश्राम याने कातामध्ये सुवर्ण व कुमितेमध्ये कांस्य पदक जिंकले, तर छनछन योगेश पडोळे हिने काता आणि कुमिते या दोन्ही क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकावर नाव कोरले. ईश्वरी रामकृष्ण गेडाम हिने कातामध्ये कांस्य व कुमितेमध्ये सुवर्ण, तर मनस्वी मुकेश माथुर हिने देखील कातामध्ये कांस्य व कुमितेत सुवर्ण पदक मिळवले. सानिध्य मंगेश वतीले याने कातामध्ये रौप्य व कुमितेत सुवर्ण पदक पटकावले.
त्याचप्रमाणे वेदांत ज्ञानेश्वर सोयाम याने कातामध्ये सुवर्ण व कुमितेत रौप्य, तर रुद्र प्रदीप सोमनकर याने कातामध्ये सुवर्ण व कुमितेत रौप्य पदक आपल्या नावे केले. अथांक दीपक पडोळे आणि ओम प्रवीण कुमरे या दोघांनी काता व कुमिते या दोन्ही प्रकारात प्रत्येकी दोन रौप्य पदके मिळवली. साईप्रसाद हितेश नागभीडकर याने कातामध्ये रौप्य व कुमितेत कांस्य, तर मुग्धा संदीप वटे हिने कातामध्ये रौप्य व कुमितेत कांस्य पदक जिंकले.
सांघिक कामगिरीत मुलींच्या संघाने ‘टीम काता’मध्ये रौप्य, तर मुलांच्या संघाने कांस्य पदक पटकावले. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरी योगेश पडोळे आणि रुद्र प्रदीप सोमनकर यांना ‘बेस्ट कराटे का स्टुडन्ट’ या बहुमानाने गौरवण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत पांढरकवड्याच्या खेळाडूंनी एकूण ७ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य अशा एकूण २० पदकांची कमाई केली.
यवतमाळ जिल्हा कराटे असोसिएशन द्वारा संचालित पांढरकवडा केंद्रातील विद्यार्थ्यांनी काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारात आपले वर्चस्व गाजवले. शिहान डॉ आनंद एस. भुसारी यांच्या मार्गदर्शनात सेन्साई योगेश पडोळे आणि हितेश नागभीडकर यांनी या खेळाडूंना तयार केले होते.