कामठी तालुक्यातील महिला बचत गटांसाठी सुवर्णसंधी

0
40

कामठी :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ (पोकरा) अंतर्गत तालुक्यातील 24 गावांमध्ये कृषी क्षेत्रातील आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी ‘कृषी औजारे बँक’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे नोंदणीकृत महिला बचत गटांना ६० टक्क्यांपर्यंत (कमाल २४ लाख रुपये) भरीव अनुदान दिले जाणार असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे यांनी केले आहे.

योजनेचे स्वरूप आणि लाभ या योजनेचा मुख्य उद्देश अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व आधुनिक यंत्रसामग्री माफक दरात उपलब्ध करून देणे हा आहे. प्रकल्प मूल्याच्या ६०% किंवा जास्तीत जास्त २४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित यंत्रे, पेरणी यंत्रे, बीबीएफ यंत्र, काढणी पश्चात प्रक्रिया यंत्रे इत्यादींसाठी ही योजना लागू आहे. ‘उमेद’ (एमएसआरएलएम) किंवा ‘माविम’ (एमएसव्हीआयएम) अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट यासाठी पात्र आहेत. बचत गटात किमान १० सदस्य असणे अनिवार्य आहे. ही योजना केवळ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या गावांसाठीच लागू आहे.

इच्छुक बचत गटांनी ‘एफपीओ-डीबीटी पोर्टल’ वर किंवा ‘महाविस्तार’ मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, एकाच गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लाभार्थ्यांची निवड ‘ऑनलाईन लॉटरी’ पद्धतीने अत्यंत पारदर्शकपणे केली जाईल. ग्रामीण भागातील महिलांनी संघटित होऊन शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरावी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन कामठी तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे

”कामठी तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच भाडेतत्त्वावर यंत्रे उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक गावात एक ‘अवजारे बँक’ स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून महिला बचत गटांनी यात पुढाकार घ्यावा.असे मत तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.