प्रांजल वाघ यांच्या ‘सेवा व्रता’चा प्रभाव : कामठीतील दिव्यांगांसाठी एग्रीकोज वेलफेयर सोसायटीचा मदतीचा हात

0
32

कामठी :- कामठी तहसीलमधील सुमारे ५४० दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र व UDID कार्ड नसल्यामुळे अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. ही बाब समोर आल्यानंतर संजय गांधी निराधार योजना (कामठी) अध्यक्षा प्रांजल वाघ यांनी मिशन मोडमध्ये काम सुरू करून गावागावात जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण व मार्गदर्शन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमाला प्रतिसाद देत नागपूर येथील एग्रीकोज वेलफेयर सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना आर्थिक व शैक्षणिक मदत दिली. सोसायटीतर्फे हितेश अहिरवार यांना ₹२५,०००, तृष्णवी शेखर सेलोटे यांना ₹१५,००० आणि श्रावणी महादेव धुडसे यांना ₹७,००० अशी आर्थिक मदत धनादेशाद्वारे देण्यात आली.

तसेच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी यशश्री सुनील गोधे, अक्षरा देवेंद्र नंदागवली, तनुश्री संदीप वनवे व रोहिणी रामाजी सतिकोसरे यांना त्यांच्या भावंडांसह शालेय बॅग व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. याशिवाय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पुस्तके वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमाला एग्रीकोज वेलफेयर सोसायटीचे उपाध्यक्ष व सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक सुभाष पानसे, सहसचिव राजेश कलमकर (आकाशवाणी),  विजय हुसुकले (सेवानिवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन), निलेश राऊत (सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त) व  रामदास ठाकरे (सेवानिवृत्त व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया) यांची उपस्थिती होती.

तसेच ग्रामपंचायत कढोली येथून संजय गांधी निराधार योजना अध्यक्षा प्रांजल वाघ यांच्या सोबत सरपंच लक्ष्मण करारे, दिनेश ढोले, जी.प./ग्रामपंचायत सदस्य राकेश गावडे, लक्ष्मण ठाकरे व जगदीश रंगारी यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रांजल वाघ यांनी सांगितले की शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हेच आपले ध्येय असून समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हीच खरी सेवा आहे.