spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ॲट्रोसिटी खून प्रकरणातील मृत व्यक्तींच्या वारसांना सरकारी नोकरी! जिल्हा समाजकल्याण विभागाकडून प्रक्रिया राबविली जाणार..

गडचिरोली :- जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थीक व सामाजीक मदत करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. २० नोव्हेंबर, २०२५ निर्णयानुसार अशा प्रकरणांमध्ये दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट-क किंवा गट-ड संवर्गातील शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्यात येणार आहे. अत्याचाराच्या गुन्ह्यात कुटुंबावर अचानक झालेला आघात, कमावत्या सदस्याचा मृत्यू आणि त्यानंतरची आर्थिक असुरक्षितता पाहता ही योजना पीडित कुटुंबांसाठी मोठा आधार ठरणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पात्र पीडित कुटुंबीयांनी आपली कागदपत्रे १५ डिसेंबर २०२५ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात पाठविण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या नियुक्ती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय दक्षता समिती संबंधित प्रकरणांची छाननी करणार आहे. समिती दिवंगत व्यक्तीचा खटला, कुटुंबाची परिस्थिती, आणि पात्रतेचे निकष यांची तपासणी करून आपल्या शिफारसी समाज कल्याण विभागाकडे पाठवेल. त्यानंतर समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विकास विभाग या दोन्ही विभागांमधील उपलब्ध रिक्त पदांचा विचार करून त्या अनुषंगाने पात्र वारसास नोकरी देण्याचा निर्णय घेतला जाईल. नियुक्तीस अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार पुणे येथील समाज कल्याण आयुक्तांना देण्यात आलेला आहे. शासनाने स्पष्ट सूचना देत सर्व संबंधित विभागांना कळविले आहे की, ॲट्रोसिटीच्या प्रकरणांतील सर्व प्रलंबित नियुक्ती प्रक्रिया २६ जानेवारी २०२६ पूर्वी अनिवार्यपणे पूर्ण करावी. त्यामुळे या प्रकरणांमध्ये लांबलेली प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे.

यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पात्र पीडित कुटुंबीयांनी आपली कागदपत्रे १५ डिसेंबर २०२५ पूर्वीच जमा करणे आवश्यक आहे. कागदपत्रे जमा करण्यासाठी समाज कल्याण विभागाचे कार्यालय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, LIC ऑफीस जवळ गडचिरोली-442605 या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज करता येईल.

शासनाने या प्रक्रियेसाठी पात्र वारसांची श्रेणी स्पष्ट केली आहे. सर्वात प्रथम दिवंगत व्यक्तीची पत्नी किंवा पती हे पात्र मानले जातील. त्यानंतर विवाहित किंवा अविवाहित मुलगा-मुलगी तसेच मृत्यूपूर्वी कायदेशीर दत्तक घेतलेली मुले यांचा समावेश होतो. दिवंगत व्यक्तीचा मुलगा उपलब्ध नसेल किंवा पात्र नसेल, तर सून अर्ज करू शकते. तसेच घटस्फोटीत, विधवा किंवा परित्यक्ता मुलगी किंवा बहीण ह्यांनाही पात्रता दिली आहे. दिवंगत व्यक्ती अविवाहित असल्यास त्याचा भाऊ किंवा बहीण हे वारस अर्ज करण्यास पात्र ठरतील. ही महत्त्वाची माहिती गडचिरोली समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबांनी वेळ न दवडता सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून या शासकीय रोजगारसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.