spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

फासेपारधी समाजाच्या मागण्यांना शासनाची सकारात्मक दिशा !

– आश्रमशाळेसाठी ६ कोटींची भरपाई, सात महिला बचत गटांना १.४० कोटी; भूमिहीनांना पट्टे व बेघरांसाठी ९० घरकुलांचा प्रस्ताव

आश्रमशाळेसाठी ६ कोटींची भरपाई, सात महिला बचत गटांना १.४० कोटी; भूमिहीनांना पट्टे व बेघरांसाठी ९० घरकुलांचा प्रस्ताव

नागपूर :- स्वातंत्र्यानंतर प्रथमच फासेपारधी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांची शासनस्तरावर गांभीर्याने दखल घेण्यात आल्याचा दावा फासेपारधी समाज संघटनेने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून मंत्रालयात आयोजित बैठकीत समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि मूलभूत सुविधांशी संबंधित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. दादाजी फासेपारधी समाज संघटना आणि पारधी विकास परिषदेच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत मतीन भोसले, प्रवीण पवार, प्रशांत पवार यांच्यासह समाजाच्या प्रतिनिधींनी विविध प्रश्न मांडले. अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेची इमारत समृद्धी महामार्गाच्या कामात पाडण्यात आल्याने नवीन इमारतीसाठी ६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि प्रलंबित १७ लाख रुपयांचा निधी तातडीने वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे संघटनेने सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या उपक्रमांसाठी १० एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देणे आणि आश्रमशाळेत अकरावी- बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. याशिवाय १४ एप्रिल १९९० पूर्वीपासून सरकारी ई- क्लास जमिनीवर कसणूक करणाऱ्या भूमिहीन फासेपारधी बांधवांना नियमानुसार मालकी हक्काचे पट्टे देण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले. पारधी पॅकेजमधील ७ कोटी रुपयांच्या निधीतून सात महिला बचत गटांना प्रत्येकी २० लाख रुपये, असे एकूण १ कोटी ४० लाख रुपये वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित निधी अपंग, अंध आणि विधवा महिलांच्या कल्याणासाठी वापरण्याबाबतही चर्चा झाली. समाजातील बेघर कुटुंबांसाठी ९० घरकुले उपलब्ध करून देणे तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वतंत्र फासेपारधी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्या बाबतही सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. या निर्णयांमुळे फासेपारधी समाजाच्या शिक्षण, निवारा, जमीन, महिला सक्षमीकरण आणि रोजगाराच्या प्रश्नांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या बैठकीतील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास समाजाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. समाजाच्या मागण्यांची दखल घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच मतीन भोसले, प्रवीण पवार, प्रशांत पवार आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार परिषदेच्या मंचावरील नुरदास पवार, योगेश पवार, मतीन भोसले आणि रुपेश पवार यांची उपस्थिती होती.

Popular Articles