spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांकडून सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

मुंबई, दि. २६ : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच लोकभवन येथील पोलीस अधिकारी व अंमलदारांना भ्रष्टाचार निर्मूलनाची ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ दिली.

देशाच्या आर्थिक, राजनीतिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सरकार, नागरिक आणि खासगी क्षेत्र यांसह सर्व भागधारकांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरिकाने भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात साथ दिली पाहिजे, असे सत्यनिष्ठा प्रतिज्ञेत म्हटले आहे.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दिलेले लेखी संदेश वाचून दाखवले.

“भ्रष्टाचारामुळे विकासाची गती मंदावते आणि सार्वजनिक संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो. भ्रष्टाचाराचे उच्चाटन झाल्यास विकसित भारताचे उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वी गाठता येईल,” असे राज्यपालांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे.

भ्रष्टाचार निर्मूलनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून, समाजातील प्रत्येक घटकाची आहे. भ्रष्ट्राचार मुक्त समाजाची सुरुवात स्वतःपासून करण्याचा संकल्प प्रत्येकाने करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ‘समृध्दीसाठी सत्यनिष्ठा’ हे या सप्ताहाचे ब्रीदवाक्य आहे.

Popular Articles