– भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त विविध उपक्रमांतील विजेत्यांचा होणार गौरव
नागपूर :- जवाहर विद्यार्थी गृह, नागपूरच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कुमार दिवटे यांच्या नेतृत्वात आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली. यावेळी संस्थेचे मुख्यकार्यवाह हर्षवर्धनजी बेले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर आणि भारतीय इतिहास प्रबोधिनी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातील विजेत्या व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य बक्षीस वितरण सोहळा २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता. जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमा नंतर दुपारी १२ वाजता. तेली समाजातील दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पीएच. डी. पदवीधारक, वयाची ७५ वर्षे पूर्ण करणारे ज्येष्ठ नागरिक, वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण करणारी दाम्पत्ये आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्या बरोबरच ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या समाज बांधवांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा संस्थेचा हा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष नरेंद्र कुमार दिवटे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी, पालक तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर विद्यार्थी गृहचे अध्यक्ष नरेंद्र कुमार दिवटे, मुख्यकार्यवाह हर्षवर्धनजी बेले व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी नरेंद्रकुमार दिवटे, बालानंद टापरे, प्रज्ञा बडवाईक, प्रवीण अंबागडे, लोकनाथ भुरे, रमेश पिसे, प्रफुल रेवतकर, विजय मोटघरे, हरिष जयपूरकर, देवेंद्र वाडीभस्मे, प्रकाश तिळगुळे, हरिष दांडेकर यांची उपस्थिती होती.








