spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पांढरकवडा शहरात भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

पांढरकवडा :- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागविण्यासाठी पांढरकवडा शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, आखाडा वॉर्ड येथून या रॅलीला सुरुवात झाली.

हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभाग घेतला. देशभक्तीपर गीत व घोषणा, तिरंग्याच्या रंगांनी सजलेले वातावरण आणि भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रॅलीमध्ये केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. राजु तोडसाम, नगराध्यक्ष आतिश बोरेले, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रेवैय्या डोंगरे, तहसीलदार राजेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी मधुकर मुंडे, पोलीस निरीक्षक एल.डी तावरे यांच्यासह पांढरकवडा शहरातील विविध नामांकित शाळेतील विद्यार्थी तसेच महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील देशभक्त नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

रॅलीच्या माध्यमातून आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी हिंदू-मुस्लिम-शिख बांधवांना एकत्र आणून राष्ट्रध्वजाला फहरवून एकतेचे उदाहरण घडवून आणले, राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि नागरिकांमध्ये राष्ट्राभिमानाची भावना दृढ करण्याचा संदेश यातून देण्यात आला. मार्गावर नागरिकांनी तिरंगा रॅलीचे उत्साहात स्वागत केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Popular Articles