लेझीम पथकाच्या तालात ग्रंथदिंडीने घेतली शहरफेरी

0
49

– जिल्हा ग्रंथोत्सवाची उत्साहात सुरुवात, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- वाचन संस्कृतीचा जागर करत जिल्हा ग्रंथालय कार्यालयातर्फे आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचे आज सकाळी जकातदार माध्यमीक विदयालयात थाटात उद्घाटन संपन्न झाले .आज सकाळी ग्रंथ पूजन व ग्रंथ दिंडी ने वातावरण भारावून गेले होते.

जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक विद्यालय भंडारा येथे आज सकाळी जिल्हा ग्रंथोत्सवाला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता आधी ग्रंथ पुजन झाले. ग्रंथ भारतीय संविधान व अन्य महत्वाचे ग्रंथ पालखीत ठेवलेले होते. या ग्रंथ दिंडीने जकातदार विदयालयापासून मुख्य मार्गाने शहरातल्या मुख्य गांधी चौकापर्यंत मार्गक्रमण केले. या ग्रंथ दिंडीला जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरगटे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक विद्यालय रीना काळे, उपशिक्षणाधिकारी झालटे तसेच ग्रंथालय संचालक रामदास साठे, संजय नारनवरे विकास निमकर, घनश्याम कानतोडे, इस्तरी मेंढे, तसेच जकातदार माध्यमिक शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी, नागरिक, पत्रकार उपस्थित होते. नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी लेझीम पथकाद्वारे ग्रंथ दिंडीमध्ये उत्साह निर्माण केला.

ग्रंथदिंडी गांधी चौका मार्गे पुन्हा कार्यक्रमस्थळी आली. त्यानंतर सकाळी साडे अकराच्या सुमारास ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या उद्घाटनाला नगराध्यक्ष मधुरा मदनकर, जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वर बोरीगडे , जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, ज्येष्ठ साहित्यिक नागपूर ज्ञानेश्वर वाकुडकर, ग्रंथालय सहायक संचालक रामदास साठे, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, जकातदार महाविद्यालयाचे अध्यापक वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागची भुमिका मांडली.

भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या अभ्यासिका वाचनालय व ग्रंथालयाच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे व त्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील 200 हून अधिक सार्वजनिक वाचनालयामध्ये अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी यावेळेस केले.

नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांनी वाचनाची निकड व ग्रंथालयांची आवश्यकता याबाबत भाष्य केले.

राज्य ग्रंथालय चळवळीचे गजानन कोटेवार यांनी ग्रंथालय चळवळीवर प्रकाश टाकला.तसेच ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी ग्रंथालयांना आर्थिक अनुदान दिले पाहिजे तरच ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतील ,अशा पद्धतीचे विचार त्यांनी यावेळेस मांडले.

कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर यांनी त्यांच्या साहित्यिक शैलीत अनेक खुमासदार कविता, शेर सादर केले. तसेच समाज म्हणून आपण वाचन चळवळीच्या पाठीशी उभे राहिलो पाहिजे. आपल्यातील प्रेरणा जिवंत ठेवण्यासाठी पुस्तकांचे वाचन केले पाहिजे . बदलत्या परिस्थितीनुसार सकारात्मक बदल घडवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे सांगितले.उदघाटकीय कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्राध्यापक नरेश् आंबिलकर यांनी केले.

या कार्यक्रमाला नागरीक,विदयार्थी,तसेच विविध ग्रंथालयांचे ग्रंथपाल,ग्रंथसेवक उपस्थित होते.