– विकास कामांना गती देण्याचे पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश
नागपूर :- महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांअंतर्गत शहरात सुरू असलेल्या विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश देत राज्याचे महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील विकास कामांचा सखोल आढावा घेतला.
सदर बैठक नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास ठाकरे, आमदार प्रवीण दटके, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., मुख्य अभियंता मनोज तालेवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त राजेश भगत, अधीक्षक अभियंता लिना उपाध्याय, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक ऋतुराज जाधव, कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, कार्यकारी अभियंता अश्विनी येलचेटवार, यांच्यासह महानगरपालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर संगणकीय सादरीकरणाद्वारे शहरात सुरू असलेल्या विकास कामांची माहितीआयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. यात प्रधानमंत्री आवास योजना, भागीदारी तत्वावर परवडणारी घरे (एएचपी), रमाई घरकुल, शबरी घरकुल योजना, रस्ते विकास, सिमेंट रस्ते विकास टप्पा – ४, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले प्रकल्प, प्रस्तावित सिमेंट रस्ते, विकास कामांच्या पूर्णत्वा बद्दल माहिती, आयआयटीएमएस अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती यावेळी देण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजा वांजरा येथे ४८० सदनिकांना मंजुरी मिळाली आहे. या सर्व सदनिकांचे जून २०२५ मध्ये लाभार्थींना वितरण करण्यात आले आहे. यावर ५५ कोटी २९ लाख रुपये खर्च झाले आहेत. वैयक्तिक घरकुल बांधण्यास अनुदान योजनेअंतर्गत २३२८ लाभार्थींचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा २ अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाच्या सहकार्याने योजना राबविली जात आहे.
एएचपी घरे
भागीदारी तत्वावर परवडणारी घरे (एएचपी) अंतर्गत नारी, पुनापूर व हुडकेश्वर भागात घरकुल बांधले जात आहेत. यात नारी भागात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. यात नारी भागात ५१८, पुनापूर भागात ८४० व हुडकेश्वर भागात २४० सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत २०१४ ते २०२५ या काळात ६२२९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
सिमेंटचे रस्ते
सिमेंट रस्ते प्रकल्प टप्पा ४ अंतर्गत एकूण ३३ कामे मंजुर असून रस्त्यांची लांबी २३.४५ किलोमीटर एवढी आहे. यापैकी बहुतांश कामे पूर्णत्वास आलेली असून, यावर ३०० कोटी रुपये खर्च होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शहरतील विकास कामांच्या संदर्भात विकास कामांचा आढावा घेताना तसेच त्या संदर्भातील माहिती आमदारांना मतदारसंघनिहाय विकास कामांची माहिती देण्यात यावी. शहरातील अविकसित भागाच्या विकासाकडे अधिक लक्ष केंद्रीत करावे, निर्देश यावेळी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले. शहरातील रस्त्यांची डागडुजीसाठी महानगरपालिका व एनआयटीच्या हॉट मिक्स प्लांटचा अधिकाधिक वापर करावा, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
यावेळी आमदारांनी आपआपल्या विधानसभा मतदारसंघातील समस्या पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या सर्व समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी व संबंधित आमदारांना याबद्दल माहिती द्यावी, असेही पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी सुचविले. प्रारंभी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी तुळशीचे रोपटे देऊन पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व आमदारांचे स्वागत केले.




