गडचिरोली :- राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज स्थानिक जिल्हा महिला व बाल रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
याप्रसंगी स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे, सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली, कुटुंब कल्याण आरोग्य सेवा पुणे विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड, नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके व यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशजी आबिटकर यांनी दि.14 फेब्रुवारी 2026 रोजी डीईआयसी जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केवळ सोयी-सुविधांची पाहणीच केली नाही, तर उपचार घेत असलेल्या चिमुकल्यांशी संवाद साधत यंत्रणेला संवेदनशील कामासाठी प्रोत्साहित केले.
शस्त्रक्रिया झालेल्या बालकांचे भावनिक आभार – रुग्णालयातील भेटीचा सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे ‘जीवनदायी’ ठरलेल्या बालकांची भेट. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्यसेवा पुरवताना अनेक अडचणी येतात. परंतु यावर मात करत आपल्या बालकांबाबत संभ्रमित असणाऱ्या पालकांना डीईआयसी मार्फतीने उच्चस्तरीय सेवा मिळाल्याने पालक समाधानी आहेत.
हृदय शस्त्रक्रिया: गंभीर हृदयविकार असलेल्या ज्या बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली, त्यांची श्री. आबिटकर यांनी आस्थेने विचारपूस केली. यावेळी एका चिमुकल्याने त्यांना पुष्पगुच्छ देऊन जेव्हा ‘थँक्यू’ म्हटले, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.
कर्णबधिर व दृष्टीदोष उपचार:
जन्मत: ऐकू व बोलू न शकणाऱ्या बालकांच्या गुंतागुंतीच्या, अत्यंत महागडी कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया डीईआयसी मार्फतीने मोफत झाल्यामुळे आणि डोळ्यांचे आजार असलेल्या बालकांवर मोफत शस्त्रक्रियांमुळे त्यांना नवे आयुष्य मिळाले आहे. या मुलांच्या पालकांनी “आमच्या लेकराला जग दिसलं आणि ऐकू व बोलण आलं, हे साहेबांमुळेच” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
आबिटकर यांनी रुग्णालयातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राला (District Early Intervention Centre – DEIC) विशेष भेट दिली.

DEIC: जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (सविस्तर माहिती)
शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये DEIC केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मार्फत तालुक्यातील वैद्यकीय पथकाद्वारे ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक/विद्यार्थी यांच्या सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य तपासणी करून जन्मत: आजार असणारी बालके शोधली जातात. बालकांच्या पुढील तपासणी/उपचार, विशेष चाचण्या, निदान निश्चिती, उच्च स्तरीय विशेषज्ञ सल्ला/सेवा, शस्त्रक्रिया इत्यादीकरिता “द्वितीयस्तरीय संदर्भसेवा कक्ष” म्हणून डीस्ट्रीक्त अर्ली इंटरवेन्शन सेंटर (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे स्थापित असून यामध्ये गरजेनुसार द्वितीयस्तरीय तथा तृतीयस्तरिय आरोग्य सेवा प्रदान करण्यात येते.
DEIC म्हणजे काय?
(जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र) हे केंद्र म्हणजे शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठीचे एक वरदान आहे. जन्मतः असणारे दोष (Birth Defects), विकासात्मक विलंब (Developmental Delay) व इत्यादी यांचे वेळीच निदान करून त्यावर उपचार करणे हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मंत्र्यांनी घेतलेला आढावा:
बालकांसाठी एकाच छताखाली तज्ज्ञ टीम: केंद्रात बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट (ऐकण्याच्या समस्या तज्ज्ञ) स्पीच थेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट(डोळ्याच्या समस्या तज्ज्ञ), वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक यांच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली.
सुविधा: या ठिकाणी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपकरणांची पाहणी करून, जास्तीत जास्त ग्रामीण बालकांपर्यंत ही सुविधा पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले
“सरकारी रुग्णालय हे गोरगरिबांसाठी आशेचा किरण आहे. आज ज्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसले, तेच आमच्या कामाचे खरे पावती आहे,” असे भावनिक उद्गार प्रकाश आबिटकर यांनी यावेळी काढले. या भेटीमुळे आरोग्य प्रशासनात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, कामाला नवी गती मिळाली आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. वर्षा लहाडे यांनी कळविले आहे.








