spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उष्णतेच्या कहर ; नंदापूरीत भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी वणवण 

– पेंच कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी 

सचिन चौरसिया, रामटेक :- वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत असून नंदापुरी गावातील पाण्याचे स्रोत नाले, नदी, तलाव, विहीर कोरड्या पडल्या असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत नंदापुरीच्या सरपंच वनिता मनोज नौकरकर यांनी राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांना निवेदन देत पेंच कालव्याचे पाणी नहरामध्ये तातडीने सोडण्याची विनंती केली आहे. नंदापुरी गावालगत असलेल्या नदीवरील पाणीपुरवठा विहिरीवर संपूर्ण गावाची तहान भागवली जाते. मात्र यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे नदीपात्र कोरडे पडू लागल्याने विहिरीचे नैसर्गिक झरे पूर्णपणे बंद झाले आहेत. परिणामी विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाला असून गावाला नियमित पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. सध्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. एवढेच नव्हे तर नदी-नाले आटल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. पेंच कालव्याचे पाणी सोडल्यास गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल तसेच जनावरांनाही दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. गावकऱ्यांकडूनही प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नंदापुरीची पाणी समस्या सोडवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

“नंदापुरी गावात सध्या अत्यंत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांना पत्र देऊन पेच कालव्याचे पाणी तातडीने नहरामध्ये सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेतल्यास गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होईल,” – 

– वनिता मनोज नौकरकर (सरपंच, ग्रामपंचायत नंदापुरी)

Popular Articles