– शेतात विद्युत तारेचा करंटने अस्वलाचा मृत्यू
सचिन चौरसिया, रामटेक :- देवलापार वनपरिक्षेत्र ( प्रादेशिक ) हद्दीतील शेतात जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या विद्युत तारेचा करंट लागून ६ ते ७ वर्षाच्या मादी अस्वलाच्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने आपला गुन्हा लपवण्यासाठी अस्वलाचे शव लगतच्या शेतात पुरले असून ही घटना शुक्रवार (दि.२२) ला उघडकीस आली. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. टुले यांनी तात्काळ तपासणी करत मुख्य आरोपी, सहआरोपीला अटक करण्यात आली.
वनपरिक्षेत्र देवलापार (प्रादे.) अंतर्गत असलेल्या शेत सर्व्हे क्र.१० मौजा उमरी येथील शेतमालक जयदेव रामसिंग सलामे याने वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेताभोवती विद्युत तारेच्या करंट लावला होता. त्यात अस्वल अडकले व त्याचा मृत्यू झाला. गुन्ह्याची वाच्यता होऊ नये म्हणून आरोपीने त्याचे साथीदार अविनाश यशवंत कोकोडे आणि हमेशलाल हमीलाल उईके यांच्या मदतीने अस्वलाचा मृतदेह शेताशेजारीच ५० ते ६० मीटर अंतरावर खड्डा करून पुरला. गुप्त माहिती देवलापार प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. टुले यांना मिळताच तात्काळ कर्मचारी घेऊन घटनास्थळ गाठून शेतात पाहणी केली. तेथे सभोवताल विद्युत तारेचे करंट जोडलेले दिसले असताच संशयित आरोपी जयदेव रायसिंग सलामे यांची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत अस्वल मरण पावला व त्यास लगतच्या शेत मौजा जुनेवानी येथे खड्डा खोदून पुरल्याची कबुली दिली. सहआरोपी अविनाश यंशवत कोकोडे, हमेशलाल हमीलाल उईके यांचे विरोधात सदर प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २(१६)c, २(३६), ९, ३९, ३९(२), ४८(A), ५०, ५१(१), ५२, ५७ नुसार वनगुन्हा क्रमांक ०४७५०/११८७४६ दाखल करुन आरोपीस अवैध शिकार वनगुन्हा प्रकरणी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
देवलापारचे वनपरीक्षेत्र अधिकारी शेषराव टुले यांनी याबाबतची माहिती त्यांचे वरीष्ठ उपवनसंरक्षक डॉ विनिता व्यास व सहाय्यक वनसंरक्षक गोविंद लुचे यांना कळविले. मादक वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली अस्वलाला पुरलेला खड्डा खोदण्यात आला. जवळपास ५ ते ६ दिवसांपुर्वी पुरलेले मादी अस्वल कुजलेल्या अवस्थेत असल्याचे निश्पन्न झाले. देवलापारचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ किशोर भदाने यांनी जागेवरच उत्तरीय तपासनी केली व जवळच त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.