भंडाऱ्यात मुसळधार पावसाने जीर्ण घराची भिंत कोसळली; गाय-शेळ्यांचा मृत्यू, शेतकऱ्याचे 1,22000/- rupay नुकसान

0
57

 

भंडारा २९ : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात २८ ऑगस्ट रोजी दुपारी मुसळधार पावसासह मेघगर्जना झाल्याने निलागोंदी येथे मोठी दुर्घटना घडली. गौरीशंकर केवळराम वंजारी यांचे जुने व जीर्ण अनिवासी घर अचानक कोसळून त्याची भिंत शेजारील टेकचंद सिताराम वंजारी (वय ४२) यांच्या अंगणात व गुरांच्या गोठ्यावर पडली. ही घटना दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. भिंत कोसळल्याने अल्पभूधारक शेतकरी टेकचंद वंजारी यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांची एक गाय, दोन शेळ्या व दोन कोंबड्या मलब्याखाली दबून जागीच ठार झाल्या. यामध्ये टेकचंद यांची पत्नी वैशाली वंजारी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना विटांच्या ढिगाऱ्यातून गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी साकोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून मानेला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जाते. तसेच एका गायीचा पाय मोडल्यामुळे तीही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेत पंचनाम्यानुसार टेकचंद वंजारी यांचे अंदाजे १ लाख २२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मोरगाव साझाचे तलाठी निशांत नेवारे व पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश कापगते यांनी पंचनामा केला. तर सरपंच वर्षा वंजारी, उपसरपंच महेश हटवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष यशोराज हटवार व ग्रामपंचायत सदस्य छत्रपती हटवार यांच्या उपस्थितीत जेसीबी बोलावून गावकऱ्यांच्या मदतीने मलबा हटविण्यात आला.