बीड ३० : बीड जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव वेगाने धावणाऱ्या कंटेनरने सहा जणांना चिरडले. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सहा झाला आहे.
अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण बीड तालुक्यातीलच असून ते पायी प्रवास करून पेंडगाव येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी जात होते. मृतांमध्ये दिनेश दिलीप पवार (रा. माऊलीनगर, बीड), पवन शिवाजी जगताप (रा. अंबिका चौक, बीड), अनिकेत रोहिदास शिंदे (रा. शिदोड, ता. बीड), किशोर गुलाब तोर (रा. बाभूळतारा, ता. गेवराई), आकाश अर्जुन कोळसे (रा. रिलायन्स पंप परिसर, बीड) आणि विशाल श्रीकिसन काकडे (वय 22, रा. शेकटा, ता. शेगाव) यांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळच्या सुमारास हे सहाहीजण पायी चालत महामार्गावरील उड्डाणपुलाजवळून पुढे जात असताना अचानक मागून आलेल्या कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि कंटेनरचे दोन्ही चालक ताब्यात घेतले आहेत. मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सर्विसरोड नसल्याने अशा प्रकारचे अपघात सातत्याने घडत आहेत. महामार्गावरील भरधाव वाहने आणि पादचारी यांच्यातील टक्करांमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आजच्या अपघाताने जिल्हा शोकाकुल झाला असून पायी चालत धार्मिक स्थळांच्या दिशेने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.



