नवी दिल्ली ३० : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या धोरणाबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. संघाच्या 100 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित “100 वर्षांची संघ यात्रा : नवे क्षितिज” या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील जन्मदर, लोकसंख्याशास्त्र आणि नव्या पिढीच्या जबाबदाऱ्या या विषयांवर भाष्य केले. यावेळी भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले की, आता “हम दो, हमारे तीन” या धोरणाची गरज आहे.
मोहन भागवत म्हणाले की, “जगभरात शास्त्रज्ञ सांगतात की जर जन्मदर 3 पेक्षा कमी झाला, तर तो समाज हळूहळू नाहीसा होतो. त्यामुळे किमान 3 अपत्ये असणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या मते, जर दांपत्याला तीन मुले असतील, तर आई-वडिलांचे आरोग्य चांगले राहते. शिवाय मुलांमध्ये परस्पर समज वाढते, ‘इगो मॅनेजमेंट’ शिकतात आणि घरात भांडणंही कमी होतात.”
ते पुढे म्हणाले, “आज देशाची सरासरी 2.1 आहे. गणितात ही संख्या योग्य असली, तरी माणसांच्या भाषेत 2.1 म्हणजे 3 होतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने तीन मुलांची कल्पना स्वीकारली पाहिजे. मात्र याचबरोबर त्या तीन मुलांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची जबाबदारीदेखील पालकांनी घ्यायला हवी. तीनपेक्षा जास्त मुले होऊ नयेत, हे समाजाने मान्य केले पाहिजे.”
भागवत यांनी हिंदू समाजातील घटता जन्मदर अधोरेखित करताना म्हटले की, “हिंदू समाजात जन्मदर आधीच कमी होता, आता तो आणखी घटत आहे. त्यामुळे तीनपेक्षा कमी मुले नसावीत, यासाठी नवीन पिढीला तयार केले पाहिजे. ज्यांच्या हातात हे कार्य आहे, त्यांनी जबाबदारीने ते पार पाडावे.”
लोकसंख्येचा विचार फक्त आकड्यांचा नसून उद्दिष्टांचा आहे, असंही त्यांनी नमूद केलं. “लोकसंख्याशास्त्रातील बदलांचे दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे हा फक्त लोकसंख्येचा नाही, तर हेतू आणि संतुलनाचा प्रश्न आहे,” असं स्पष्ट करत भागवत यांनी लोकसंख्या धोरणासाठी नवा फॉर्म्युला मांडला.



