मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली, विनायक आर. जोशी यांचा निर्णय
जन्मठेपेसह ₹5,000 दंड; दंड न भरल्यास 6 महिन्यांची वाढीव शिक्षा
गडचिरोली २८ : मौजा जपतलाई (कोवानटोला), ता. धानोरा, जि. गडचिरोली येथील परसराम धानुजी कुमरे (वय 48 वर्ष) यास त्याच्या पत्नी मिराबाई परसराम कुमरे (वय 37 वर्ष) हिच्या खून प्रकरणी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. यासोबतच ₹5,000/- दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून, दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्यांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
दिनांक 04 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री सुमारास 01.00 वाजता, आरोपी परसराम कुमरे याने पत्नी मिराबाईच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत भांडण केले. भांडणाच्या भरात त्याने खलबत्याच्या लोखंडी मुसळाने व चाकूने पत्नीच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आरोपीची बहिण आशाबाई रावजी पोटावी यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे धानोरा येथे गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा नोंदविल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे यांनी आरोपीस त्याच दिवशी अटक केली. तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर खटल्यात फिर्यादी, पंच, साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद विचारात घेत मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली विनायक आर. जोशी यांनी आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व ₹5,000/- दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणी सहा. जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी सरकारी पक्षाचे कामकाज पाहीले. तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे यांनी केला. तसेच कोर्ट पैरवीसाठी पोनि चंद्रकांत वाबळे, श्रेणी पोउपनि शंकर चौधरी, श्रेणी पोउपनि भैयाजी जंगटे, मपोहवा जिजा कुसनाके, मपोहवा मिनाक्षी पोरेड्डीवार, पोशि जिवन कुमरे आणि मपोशि छाया शेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
@filephoto




