महसूलमंत्री बावनकुळे व जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट; चौकशीचे आदेश
सावनेर २८ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी यांनी आज नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयास अचानक भेट दिली असता, कार्यालयातील भोंगळ कारभार उघडकीस आला.
भेटीदरम्यान दुय्यम निबंधक अधिकारी गैरहजर असल्याचे आढळले. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या हजेरी पुस्तिकेत नावे व स्वाक्षऱ्या नसणे, कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रांचा अभाव आणि अनधिकृत व्यक्तींचा कार्यालयात मुक्त वावर या गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
भेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधल्यानंतर, त्यांनी कार्यालयातील कामकाज, सेवांची गुणवत्ता, पारदर्शकतेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीसंदर्भात गंभीर तक्रारी केल्या. नागरिकांच्या या तक्रारींनी महसूलमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांची चिंता वाढवली.
या गंभीर प्रकाराची तत्काळ दखल घेत, महसूलमंत्री बावनकुळे यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. याबाबत संपूर्ण चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर, जिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलीस उपअधीक्षक यांना नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या अचानक भेटीदरम्यान आ. डॉ. अशीषराव आर. देशमुख अनेक भाजपा कार्यकर्ता सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, कार्यालयातील अनियमिततेबाबत कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.




