– हत्येत सहभागी दोघेही पोलीसांच्या ताब्यात
पांढरकवडा :- केळापूर तालुक्यातील गोपालपूर येथील कोलामपोड परिसरात ५१ वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. कमलाबाई हुसेन मेश्राम असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संशयित पती हसेन गट्टू मेश्राम याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. तसेच मनीषा आत्राम हिनेही या हत्येत सहभाग असल्याची कबुली दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्य्याच्या संशयावरून कमलाबाई या पतीपासून वेगळ्या राहत होत्या. सोमवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्या सदाशिव वाघधरे यांच्या अंगणात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल वार करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील रमेश कुटलवार यांनी पांढरकवडा पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. प्राथमिक तपासात संशयातून हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत पती हुसेन मेश्राम व मनीषा आत्राम यांनी मिळून खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत.