– धर्मराज प्राथमिक शाळेत संगणकीय शिक्षणाचा शुभारंभ
– प्राथमिक विभागापासुन संगणक ज्ञान देणारी पहिली शाळा
कन्हान :- बालवयातच चिमुकल्यांना संगणक ज्ञान प्राप्त झाले तर शैक्षणिक विकास अधिक जोमाने घडुन येईल. त्यामुळे धर्मराज प्राथमिक शाळेत उप लब्ध झालेल्या संगणकीय ज्ञानातुन शैक्षणिक विचारां ची ज्योत पेटवावी, असे आवाहन उद्घाटक हिराताई पाहुणे यांनी केले.
सोमवार (दि. ९) मार्च ला धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री-कन्हान येथे “संगणक कक्षाचे उद्घाटन व जागतिक महिला दिनानिमित्त मातृवंदन” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन धर्मराज शैक्षणिक संस्थेच्या माजी मुख्याध्यापिका हिरा पाहुणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव खुशालराव पाहुणे तर प्रमुख पाहुणे म्हणुन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वीय सहायक व कांद्रीचे माजी सरपंच जयराम मेहरकुळे, गटशिक्षणाधिकारी सुनील कोडापे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विधिलाल डहारे, मुख्याध्यापक खिमेश बढिये, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. हरिष पोटभरे उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन करुन विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाची कवाडे उघडी करुन देण्यात आली. हे संगणक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निधीतुन उपलब्ध झाले. यावेळी माजी सरपंच मेहरकुळे यांनी पालकमंत्री बावनकुळे यांचा शुभेच्छा संदेश वाचुन दाखवित आगामी काळात शाळेला एआय आधारित दोन इंटेलेक्चुअल पॅनल देण्याचे व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गटशिक्षणाधिकारी कोडापे यांनी शाळेने विद्यार्थी हितार्थ राबविलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा करीत प्राथमिक पासुन संगणक ज्ञान देणारी ही पहिलीच शाळा असल्याचे नमुद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी करुन शाळा विकास व उपक्रम याची माहिती दिली. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या आईला गुलाब पुष्प देऊन मातृ वंदन केले. हा हळवा क्षण माता पालकांना सुखद अनुभव वाटला. कार्यक्रमाचे संचालन गणेश खोब्रागडे यांनी तर उपस्थितांचे आभार अर्पणा बावनकुळे यांनी मानले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता चित्रलेखा धानफोले, भिमराव शिंदेमेश्राम, किशोर जिभकाटे, राजु भस्मे, गणेश खोब्रागडे, अमीत मेंघरे, प्रिती सुरजबंसी, अर्पणा बावनकुळे, कु शारदा समरीत, कु हर्षकला चौधरी, सुनीता मनगटे, सुलोचना झाडे, नंदा मुद्देवार आदींनी सहकार्य केले.