spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

2756 मुलींना मिळणार मोफत ‘एचपीव्ही’ लस

– मोहिमेसंदर्भात सिटी टास्क फोर्स बैठक संपन्न

– शहरी आरोग्य केंद्रांमार्फत मोहिम राबविणार

चंद्रपूर :- महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहरातील पात्र 2756 मुलींना मोफत ‘एचपीव्ही’ लस मनपा आरोग्य विभागातर्फे दिली जाणार आहे

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिम (HPV Vaccination Campaign) व नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिटी टास्क फोर्स (City Task Force) बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक आज दुपारी 4 वाजता महानगरपालिका स्थायी समिती सभागृहात पार पडली.

बैठकीत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी, जनजागृती, तसेच विविध विभागांमधील समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) हा एक प्रकारचा विषाणू असून त्याच्या संसर्गामुळे महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) होण्याचा धोका वाढतो. भारतातील महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार आहे. 2022 च्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे 34 हजार 805 मृत्यू या आजारामुळे झाले आहेत. या आजारापासून संरक्षण मिळावे यासाठी एचपीव्ही लसीकरण प्रभावी उपाय मानला जातो. हा एकमेव कँसर आजार आहे जो लसीकरणाद्वारे टळू शकतो.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरात ही मोहीम राबविण्यात येत असून, 14 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. सदर मोहीम सलग 90 दिवस चालणार असुन सकाळी 9 ते 2 या वेळेत तर शनिवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत सुरक्षित लस वापरुन पात्र लाभार्थी मुलीला एकच डोस दिला जाणार आहे.सदर लसीकरण ऐच्छिक असुन पालकांच्या लेखी समंती नंतरच लस दिली जाईल. लसीकरणाच्या दिवशी पात्र मुलीने घरूनच नाश्ता /जेवण करून येणे आवश्यक आहे.

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 7 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून शाळा, अंगणवाडी केंद्रे तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे व गर्भवती महिलांचे लसीकरण सुरळीतपणे राबविण्याबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला.

बैठकीस उपायुक्त शेषराव टाले ,सहायक आयुक्त शुभांगी सुर्यवंशी,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,डॉ. अश्विनी भारत,डॉ.आरवा लाहिरी,डॉ. योगेश्वरी गाडगे,डॉ.शरयु गावंडे,डॉ.नेहा वैद्य,डॉ. जयश्री मालुसरे, डॉ अल्फीया खान, डॉ. समृद्धी वासनिक,शारदा भुक्या, ग्रेस नगरकर उपस्थित होते.डॉ. अश्विनी भारत यांनी नियमित लसीकरण सत्राच्या आयोजनाचे पॉवर पॉईंट द्वारे सादरीकरण केले.

एचपीव्ही लसीमुळे वंध्यत्व,गर्भपात किंवा जन्मदोष होऊ शकतात का ? –

नाही, वैज्ञानिक आढाव्यानुसार एचपीव्ही लसीचा वंध्यत्व,गर्भपात किंवा जन्मदोष यांच्या कुठलाही संबंध आढळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)    एचपीव्ही लसीकरण पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे पालकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता आपल्या मुलींचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.

एचपीव्ही लसीकरणासाठी काय आवश्यक ? –

मनपा आरोग्य केंद्रात यू-विन (U-Win) पोर्टल द्वारे ऑनलाईन नोंदणी करून व पालकांच्या समतीनंतरच लसीकरण केले जाणार आहे. मात्र नोंदणीसाठी पालकांचे मोबाईल नंबरशी संलग्न असलेले आधारकार्ड तसेच जन्म दाखल्याचा पुरावा आवश्यक राहणार आहे.

चंद्रपूर शहरातील 2756 पात्र मुलींना कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित करणे हे आमचे ध्येय आहे. प्रशासनाने मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयात पथके नियुक्त केली असुन पालकांनी आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या मोहिमेत हिरीरीने सहभागी व्हावे – उपायुक्त,शेषराव टाले


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.