spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोणी काळभोरमध्ये सुगंधित तंबाखूचा अवैध कारखाना उद्ध्वस्त

– ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर :- लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाकवस्ती परिसरात सुरू असलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करण्याच्या अवैध कारखान्यावर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक दोनने छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुगंधित तंबाखू, कच्चा माल, पॅकिंग मशीन आणि चारचाकी वाहन असा एकूण ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील अवैध धंदे तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व निर्मिती करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक क्रमांक दोनचे अधिकारी व कर्मचारी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी गस्त घालत असताना लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इनोवेरा इंग्लिश स्कूलसमोर, गायकवाडवस्ती, कदमवाकवस्ती परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित सुगंधित सुपारी तयार करण्याचा अवैध कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २६, रा. काळूबाई मंदिराजवळ, थेऊर फाटा, वृंदावन कार्यालय रोड, लोणी काळभोर) हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून तयार माल, कच्चा माल, पॅकिंग साहित्य, पॅकिंग मशीन आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी गाडी असा एकूण ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला आणि प्रतिबंधित सुपारी यांची निर्मिती, साठवणूक, वितरण व विक्री करण्यास बंदी असतानाही संबंधित ठिकाणी हा व्यवसाय सुरू होता. या पदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक दोनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Popular Articles