spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बारामती परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर – खासदार सुप्रिया सुळे

बारामती :- बारामती आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, गुन्हेगारीने येथे डोके वर काढले आहे. एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी देऊन थेट त्यांच्या घराच्या आवारात घुसून गोळीबार करण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. बारामती शहरात शनिवारी एका उद्योजकाच्या गाडीवर खंडणीसाठी गाेळीबार केल्याची घटना घडली. त्यानंतर बारामती शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे. खासदार सुळे यांनी देखील पोलिस प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर साशंकता व्यक्त केली आहे. याबाबत सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे.

सुळे म्हणतात, अशा घटनांमुळे सध्या बारामतीमधील व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत. नेमके बारामती पोलिस काय करत आहेत? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही का? व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावणे आणि थेट घरासमोर येऊन गोळीबार करणे हे प्रकार बारामतीसारख्या शहरात घडतात हे अतिशय दुर्दैवी आहे. बारामती पोलिस शहर आणि परिसरात कायदा सुरक्षा अबाधित राखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करीत आहेत याचा सर्वंकष आढावा घेण्याची गरज आहे.

कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची तातडीने गांभीर्याने दखल घ्यावी. या प्रकरणाचा सखोल तपास करून गोळीबार करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात. त्यांची ही दहशत कायमची मोडून काढावी. कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक यांना धमकावण्याचे आणि त्यांच्यावर अशा पद्धतीने हल्ले करण्याचे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.

Popular Articles