कुही १४ : कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेतीची बेकायदेशीर वाहतूक करत असलेल्या ट्रकवर कारवाई करत एकाला अटक करण्यात आली असून, ट्रकसह एकूण ₹४५,५५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १३ जुलै २०२५ रोजी पाचगाव परिसरात गस्त घालत असताना करण्यात आली.
कुही पोलीस पथक पेद्वलिंग (गस्त) करत असताना, कळमना बस स्टॉपजवळ एक १२ चाकी ट्रक (क्रमांक MH-49-BH-5653) हा मागच्या भागावर काळ्या रंगाची ताडपत्री टाकून नागपूरच्या दिशेने जाताना दिसला. वाहनाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात रेती आढळली.
ट्रक चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव अंकुश गोपीचंद खोब्रागडे (वय २७, रा. निंबा, ता. जि. नागपूर) असे असून, त्याच्याकडे कोणताही रेती वाहतुकीचा अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. वाहन मालकाचे नाव रोहित बावनकर (वय ३५, रा. नरसाळा, नागपूर) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी कुही पोलीस ठाण्यात कलम ३०३(२), ४९, ३(५) भा. दं. सं., तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अंतर्गत कलम ४८(७), ४८(८) आणि खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम १९५७ च्या कलम ४, २१, तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





