spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बोलेरो पिकअपमधून १० जनावरांची अवैध वाहतूक; वरठी पोलिसांची धडक कारवाई, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,भंडारा वरठी :- भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध जनावरे वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी क्रूरतेने कोंबलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या बोलेरो पिकअपसह एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांचे या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी वरठी पोलीस स्टेशनच्या पथकाला अवैध जनावरे वाहतुकीची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुर नदीवरील पूल, दाभा येथे सापळा रचून संशयास्पद महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक MH 40 DC 5728) थांबवून त्याची तपासणी केली. यावेळी वाहनाच्या मागील डाल्यामध्ये १० गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयीपणे आणि दाटीवाटीने कोंबून त्यांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अंदाजे ८ लाख रुपये किमतीचे वाहन आणि प्रत्येकी १० हजार रुपये किमतीची १० जनावरे (एकूण १ लाख रुपये), असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.

या प्रकरणी वरठी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध अपराध क्रमांक ४४०/२०२६ नुसार, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० चे कलम ११(१)(घ), ११(१)(ड), ११(१)(थ), ११(१)(ज) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सहकलम ५-अ(१) आणि ९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मूक प्राण्यांना अशा प्रकारे क्रूरतेने वागवून त्यांची तस्करी करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सदर धडक कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मडावी, पोलीस हवालदार उईके, पोलीस नाईक शिंगाडे आणि पोलीस शिपाई चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास वरठी पोलीस स्टेशनचे अधिकारी अधिक गांभीर्याने करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.