किशोर साहू, मौदा, ता. २५:– सध्या खरीप पिकाचा शेतीचा हंगाम संपूर्ण मौदा तालुक्यात सुरू असून मिरची, वांगे, कारले, टमाटर व इतरही भाजीपाल्यांचे मशागत करताना शेतकरी दिसत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचे पाण्याचे साधन आहेत त्यांनी धान रोवणी आटोपली असून, काहींची रोवणी सुरू आहे. मात्र ही सर्व कामे करण्यासाठी कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँकेतून पुन्हा कर्ज मिळत नसल्याने असे शेतकरी त्यांच्या शेतात राबणाऱ्या मजुरांकडूनच उधारी, उसनवारी करून शेतीची कामे करत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. त्यामुळे अशा गरजू शेतकऱ्यांसाठी शासनाने त्वरित कर्जमाफी करून त्यांना पुन्हा बँकेतून कर्ज मिळण्याची सुविधा करण्याची मागणी ग्रामपंचायत खंडाळा( गांगणेर)चे माजी सरपंच तथा निमखेडा – चाचेर जिल्हा परिषद क्षेत्रातील काँग्रेसचे कार्यकर्ते मदन बरबटे यांनी केली आहे.







