उल्हास मेश्राम, कुही ८ : कुही तालुक्यातील मांढळ येथे विज वितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेला जितेंद्र (जितु) नाकाडे हा युवक आज परिसरात प्रामाणिक सेवेसाठी ओळखला जातो. पचखेडी मुख्यालयातून कामकाज पाहणारा जितु, विज ग्राहकांना कुठलीही अडचण किंवा बिघाड उद्भवल्यास एका कॉलवर तात्काळ पोहोचून समस्या सोडवतो. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये “एका कॉलवर प्रॉब्लेम साल” अशी चर्चा होत आहे.
जितेंद्र नाकाडे हा मूळ नवेगाव सिर्सी (पुनर्वसन) येथील रहिवासी. वडिलोपार्जित शेती संपादित झाल्यानंतर रोजगाराच्या शोधात तो बराच काळ भटकंती करत होता. अखेर २०२० मध्ये पचखेडी येथे कंत्राटी कामगार म्हणून त्याची नियुक्ती झाली. अल्प मानधन असूनही दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची त्याची जिद्द कायम राहिली.
आज सरकारी नोकरीत अधिकारी-कर्मचारी लाखो रुपयांचा पगार घेत असूनही सेवाभाव हरवलेला दिसतो. भ्रष्टाचार, लाचलुचपत यामुळे सर्वसामान्य जनतेला वेळ, पैसा व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत जितेंद्र नाकाडे यांची प्रामाणिकता व तत्पर सेवा ही प्रेरणादायी ठरत असून परिसरात त्यांचे काम सर्वत्र कौतुकास्पद ठरले आहे.




