spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोकाट जनावरांचा हैदोस; खापा नगरपरिषदेचे दुर्लक्ष

 

खापा, ८ : खापा शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील कोंडवाडा अनेक वर्षांपासून बंद असल्याने या जनावरांचा बंदोबस्त करणे नगरपरिषदेसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. ही मोकाट जनावरे शहरात कचरा, प्लास्टिक, कागद आणि उष्टे अन्न खात असल्याने त्यांची विष्ठा दुर्गंधीयुक्त झाली आहे, ज्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढला आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक राजेशचंद्र बुरडे यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ (Reel) तयार करून पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाला तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. मात्र, असे करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बुरडे यांनी केला आहे.

बुरडे यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, ही जनावरे मोकाट फिरत असताना आक्रमक झाली आहेत. यामुळे जर एखाद्या नागरिकाला दुखापत झाली किंवा जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांना या समस्येतून मुक्त करावे अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

मागील काही महिन्यांपासून बुरडे सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवत आहेत. पण मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

माजी नगरसेवक राजेशचंद्र बुरडे यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले, “गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मी खापा शहरातील जनतेसाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आहे. पण नगरपरिषद प्रशासन याकडे अजिबात लक्ष देत नाहीये. जर प्रशासन आमची ही मागणी पूर्ण करत नसेल, तर आम्ही शहरातील जनतेसह नगर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन आणि मोर्चा काढू. यास सर्वस्वी खापा नगरपरिषद प्रशासन जबाबदार असेल.”


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.